१०० रोपांची लागवड
ठाणे : येऊरमध्ये केवळ निसर्गाचा आनंद लुटण्याऐवजी या निसर्गाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून ठाण्यातील तीन संस्थांनी एकत्र येत देशी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. या संस्थांनी आंबा, वड, जांभूळ, पिंपळ, अशा अस्सल देशी झाडांची निवड वृक्षरोपणासाठी केली असून शनिवारी जंगलात तब्बल १०० झाडांची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने केली. त्यामुळे आता येऊरचे जंगल अधिक हिरवळीने बहरणार आहे.
ठाण्यातील वसुंधरा फाउंडेशन, हेलिंग सह्याद्री, मिशन ऑनलाईन स्वराज्य या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 16 जुलै रोजी “ऋण वसुंधरेचे” या मोहिमे अंतर्गत येऊर येथील विस्तीर्ण परिसरात 100 झाडांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत विविध संस्थांच्या 120 हून अधिक कार्यकर्त्यानी सहभाग नोंदवला. भविष्यात ही लागवड करण्यात आलेली वृक्ष बहरावीत, त्यांची चांगली वाढ व्हावी या उद्देशाने वृक्ष अभ्यासक जयेश लांबोर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूर्ण पद्धतीने या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षरोपण मोहिमेकरिता अनेक व्यक्तीनी वृक्ष दानाच्या माध्यमातूनही सहभाग नोंदवला असून येऊरच्या जंगलात पिंपळ, करंज, कदंब, सिताफळ, कांचन, बसावा, ताम्हण, अशोक, औदुंबर, वड, प्राजक्त, फ़णस, आंबा, गुलमोहर, चिकु या सारख्या देशी झाडांची लागवड करण्यात आली.
समाजमाध्यमातून या वृक्षारोपण मोहिमेला प्रसिद्धी देण्यात आल्यामुळे ठाणेकरांसह अनेक पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमात सहभाग घेतला होता तसेच केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे संगोपन करण्याचाही संकल्प यावेळी संस्थांनी केला. वर्षभरात विविध ठिकाणी देखील अशा प्रकारे वृक्षरोपण उपक्रम, पर्यावरण संवर्धना संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून वसुंधरेला अधिक फुलविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी हीलिंग सह्याद्री फाउंडेशनच्या दीप्ती कदम यांनी सांगितले. या वृक्षरोपण मोहिमेला येऊरच्या वन अधिकारी, ऑनलाईन स्वराज्य संस्थेचे संस्थापक केतन गावंड, हीलिंग सह्याद्री फाउंडेशनच्या दीप्ती कदम आणि वसुंधरा संस्थेच्या संस्थापिका सुदर्शना जगदाळे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
“ऋण वसुंधरेचे” या अंतर्गत आम्ही विविध संस्था मिळून येत्या काळातही वृक्षरोपणाचे उपक्रम अनेक ठिकाणी राबविणार आहोत. तेव्हा यापुढेही नागरिकांनी तसेच पर्यावरण प्रेमींनी उत्साहपूर्ण पद्धतीने मोहिमेत सहभागी होत अधिकाधिक झाडांची लागवड करावी असे, वसुंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका सुदर्शना जगदाळे यांनी सांगितले.
शहरातील प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी अनेक पशुपक्षी येऊरच्या जंगलात अधिवास करतात. देशी झाडांची लागवड केल्यामुळे कालांतराने पशुपक्षी अशा झाडांवर घरटी बांधून निवारा घेऊ शकतात तसेच त्यांची अन्नाचीही गरज यामुळे पूर्ण होते. तेव्हा या वृक्षरोपण कार्यक्रमांतर्गत १०० देशी वृक्षांची लागवड करत जैवविविधतेतील इतर घटकांचाही विचार करण्यात आला आहे, असे जयेश लांबोर यांनी सांगितले.