ठाणे: या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लोकसभेच्या तर शेवटच्या चार महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेली महापालिका निवडणूक होण्यासाठी २०२५ साल उजाडणार आहे.
एकीकडे विकासकामांचा धडाका सुरू असताना दुसरीकडे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू तांडव, अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी इत्यादी मुद्दे २०२३ मध्ये गाजले. पण २०२४ हे वर्ष राजकीय कलगीतुर्याचे ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी भाजपासोबत सत्तेत हात मिळवणी केली. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने विरोधक म्हणून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे या तिमाहीत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठा राडा पाहायला मिळणार आहे. ठाणे लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. शिवसेनेचे राजन विचारे दोन वेळा या मतदार संघात निवडून आले असून ते ठाकरे गटाचे आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा ठोकायला सुरुवात केली आहे.
सध्यातरी शिंदे गटाकडे या मतदारसंघासाठी चेहरा नसला तरी आयत्यावेळी चक्रे फिरु शकतात. अशीच परिस्थिती कल्याण लोकसभेची आहे. मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे येथून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपचा या मतदारसंघावर डोळा आहे. तर दुसरीकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघांचे विद्यमान खासदार आणि पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना आव्हान देण्याची तयारीही सुरू आहे. त्यामुळे या तिन्ही लोकसभांच्या निवडणुका २०२४ मध्ये गाजणार आहेत.
दिवाळीच्या आसपास विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालावर विधानसभेची रणधुमाळी अवलंबून आहे. पुन्हा मोदी सरकार देशात आले तर भाजपचे ठाण्यात वर्चस्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका २०२४ मध्ये लागणार असल्याने येणार्या वर्षातले किमान तीन महिने आचार संहितेमध्ये जाणार आहेत. या दरम्यान अनेक नवीन विकासकामांना खो बसण्याची शक्यता आहे. दरम्यान पालिका निवडणुकांना २०२५ ची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सलग दोन वर्षे प्रशासनाच्या हातात महापालिकेचा कारभार राहणार आहे.