गेल्या काही दिवसांपासून शाळा-महाविद्यालयांमधील तरूण मुलांमध्ये ( यात मुलीही मागे राहताना दिसत नाहीत) लपून-छपून धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यापैकी तर काही अत्यंत संशयास्पदरित्या ही कृती करताना दिसत होते. त्यांना अमली पदार्थांची सवय लागल्याचे नाकारता येणार नाही. अर्थात सर्वसामान्य माणुस चिंता व्यक्त करण्यापलिकडे आणि एकुणातच तरुण पिढी अमलीपदार्थाच्या पाशात अडकून जीवन बरबाद करीत असल्याची हळहळ व्यक्त करण्यापलिकडे काही करु शकत नव्हती. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवर एक रेव्ह पार्टी उधळली आणि 95 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वसामान्य माणसाला थोडा दिलासा जरूर मिळाला असेल. परंतु अशा खुल्या पार्ट्यांप्रमाणे कितीतरी छुप्या पार्ट्या अथवा खाजगीत अमलीपदार्थांचे राजरोसपणे सेवन सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेव्ह पार्टीवर पडलेल्या धाडीमुळे ही भीती अधोरेखित झाली आहे.
बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचा अतिरेक, तरुणाईला मिळालेले विचार आणि निर्णय स्वातंत्र्य, आर्थिक स्वावलंबन आणि नको त्या वस्तूंची मुबलक प्रमाणात उपलब्धता यांमुळे या पिढीचे पाय घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. संस्कारक्षम वयात कुटुंब व्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत आणि त्यामुळे नीतीमत्ता आणि नैतिकता यांचे लगाम सुटलेल्या एखाद्या वारुप्रमाणे तरूणाई उधळताना दिसत आहे. अमली पदार्थांच्या आहारी जाणार्या तरुणाईचे चोचले पुरविण्यासाठी काही महाभागांनी चक्क मोठाले कारखाने उभारल्याचे आपण पहात आहोत. हा बिनदिक्कतपणा येतो कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधताना समाजाला हात वर करुन चालता येणार नाही. पोलिसांचा अंकुश असणे हे अपेक्षित असले तरी आपले ‘सज्ञान’ (?) पाल्यावर नजर ठेवण्याचे काम पालकांना करावे लागणार आहे. या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समुपदेशक सांगत आहेत. शिक्षण संस्था याबाबत जनजागृतीचे काम करीत आहेत. रोटरीसारख्या सामाजिक संस्थांनी तर त्यांच्या कामाचा हा प्रमुख भाग बनवला आहे. परंतु तरी प्रयत्न आखुड पडत आहेत. बहुतालच्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीचे बरे-वाईट पडसाद मनुष्याच्या वर्तनावर उमटत असतात. समाजातील हे संक्रमण अपरिहार्य असले तरी ते अधोगतीच्या दिशेने कुच करु नये याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागणार. देश पोखरणाऱ्या या उपक्रमाचा मुकाबला सांघिक पातळीवरच करावा लागणार आहे. एक रेव्ह पार्टी उधळली जाणे हे या समस्येच्या हिमनगाचे एक टोक आहे. हा प्रश्न गंभीर स्वरुपाचा असून नवीन वर्षात एक मोठ आव्हान उभे करणार आहे. राक्षस अंगणी आला आहे आणि तरी आपण दारं-खिडक्या लावून घरात बसणार असू तर स्वत:ची फसवणूक करणार आहोत.