भाईंदर: ‘शूरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन’ उभारण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आल्यानंतर भूमिपूजन कार्यक्रम ऑक्टोबर२०२२ मध्ये पार पडला होता. परंतु काही कारणास्तव कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर गेल्या आठवड्यात भवन उभारण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर शहरातील मराठा बांधवांनी एकत्र येत मराठा भवनाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी कामाची पाहणी केली. यावेळी संघाचे अध्यक्ष सुरेश दळवी, कार्याध्यक्ष मनोज राणे, सरचिटणीस रमेश पवार, देवदास सावंत, संतोष गोळे, विनोद जगताप, कृष्णा दरेकर, संजय, वासुदेव सावंत, प्रविण कदम व सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पालिका हद्दीत मराठा भवन तयार करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून मीरा-भाईंदर मराठा संघाने आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार सरनाईक यांनी पालिका आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर शूरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन काशिमिराच्या महाजन वाडी येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यावर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. भवनाची इमारत १६ मजली उभारली जाणार आहे. यात २०० मुलांचे वसतिगृह, तीन मल्टिपर्पज हॉल, प्रशस्त पार्किंग व्यवस्था असणार आहे.