होम प्लॅटफॉर्मचे काम बाकी मग उद्घाटनाचा फार्स कशासाठी ?

महाविकास आघाडीने विचारला सवाल
बदलापूर : बदलापूरमध्ये होम प्लॅटफॉर्मचे काम बाकी असताना उदघाटनाचा फार्स कश्याला असा सवाल बदलापुरात महाविकास आघाडीने उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने बदलापूरच्या अर्धवट अवस्थेतील रेल्वे होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्याचा निर्णय भाजपतर्फे घेतला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. तरीही उद्घाटनाचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशाराही आघाडीने दिला आहे.
बदलापुर रेल्वे होम प्लॅटफॉर्मचे येत्या २४ फेब्रुवारीला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर ब्लॉक काँगेस कमिटीच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख किशोर पाटील व राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे श्रेय मिळवण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा  खासदार कपिल पाटील यांनी अर्धवट अवस्थेत असलेल्या बदलापूरच्या रेल्वे होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केला. होम प्लॅटफॉर्मवर शेड अर्धवट असल्याने प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची व्यवस्था प्रसाधनगृह, पंखे अशा आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. सरकते जिने, लिफ्टची कामे झालेली नाहीत, असे अर्धवट काम असताना उद्घाटनाची घाई कशाला? असा सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केला.
तर अपूर्ण अवस्थेतील होम प्लॅटफॉर्ममुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगून अर्धवट अवस्थेत काम असताना उद्घाटन करण्याचा प्रयत्न झाल्यास माहविकास आघाडी त्याला विरोध दर्शवेल असा इशारा किशोर पाटील यांनी दिला. अर्धवट अवस्थेतील होम प्लॅटफॉर्ममुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी अविनाश देशमुख, हरिश्चंद्र थोरात, दादासाहेब पाटील, प्रदीप रोकडे, भरत कारंडे, सुरेंद्र भालेराव, नीतू देशमुख, शकुंतला राजगुरू, गिरीश राणे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी उपस्थित होते.
महविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन होम प्लॅटफॉर्मची पाहणी केली. तसेच स्टेशन मास्तरांना निवेदनही सादर केले. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.