मुख्यमंत्र्यांनी कान पिळताच ३६१ कोटींच्या निविदा निघाल्या
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ३६१ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यावेळी रुग्णालय बांधण्यासाठी सरकारने ३१४ कोटींचा निधी मंजुर केला होता. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे पुढील कार्यवाहीला विलंब झाला. हे रुग्णालय आणखी मोठे करण्याच्या प्रस्तावाबाबत विचारविनिमय सुरू झाला आणि खाटांची संख्या वाढवून ते आणखी सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले. या प्रस्तावामध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुलं, डिलिव्हरी आणि महिला व ५०० खाटा जनरल रुग्णांसाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. यात जनरल खाटांमध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस, आयसीयू, नाक, कान घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. सर्व अडथळे दूर झाल्यानंतर या कामाच्या निविदा काढण्याचे काम काही महिने प्रलंबित होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची निविदा तत्काळ काढण्याचे व पुढील १५ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. हे आदेश देताना निविदा प्रक्रियेला विलंब लागल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी त्यांनी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर ९०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ३६१ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार
या योजनेमुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे. न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी व आँको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन यांसारखे अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, कर्करोग, हृदयरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकार या आजारांवरही उपचार करता येणे शक्य होणार आहे.