अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन
कल्याण : राज्याचे अर्थसंकल्प शुक्रवारी सदर झाले असून यात कल्याण-मुरबाड-माळशेज या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामूळे या प्रकल्पासाठी गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्नांना नविन चालना मिळाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदराव यांनी व्यक्त केली आहे.
या रेल्वे मार्गासाठी शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील आश्वासनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हिंदराव बोलत होते. कल्याण मुरबाड माळशेज रेल्वे मार्गाचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. १९६७ च्या काळात पहिल्यांदा या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले होते. तर हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपल्यासह अनेक जण गेल्या ४५ वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी सांगितले. या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन नविन दिशा दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी केंद्र सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.
१२७ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे २ ते अडीच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अलीकडच्या काळात तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले असून कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे आपण केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना सांगत होतो असेही हिंदराव म्हणाले. तर या प्रकल्पासाठी राज्याचाही निधी आवश्यक असल्याची भूमिका केंद्र सरकारने मांडली होती. या पार्श्वभूमीवर कालच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात हा प्रकल्प कार्यन्वित करण्यासाठी आश्वासीत केल्याचे सांगत हा प्रकल्प झाल्यास मुरबाडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागात विकासाचे दरवाजे खुले होतील. त्याचबरोबर शेतकरी, तरुण, नोकरदार, महिला, विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी मोठ्या संख्येने संधी उपलब्ध होतील असा विश्वासही
हिंदराव यांनी व्यक्त केला.