आनंद कांबळे/ठाणे
सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत असले तरी विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच होणार आहे तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आचारसंहिता जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या खास सूत्रांनी दिली आहे.
विधानसेभेची मुदत १० नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यानुसार मतदार याद्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत तसेच मतदान केंद्राचा डेटा देखील गोळा करण्यात आला आहे.
निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रा सुरु केल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाने भगवा सप्ताह तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ उठविण्यासाठी मेळावा घेणे सुरु केले आहे. आघाडीने देखील संयुक्त सभा घेणे सुरु केले आहे तर भाजपा मेळावे घेत आहे. एकूणच निवडणूक घटिका समीप आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या निवडणुकीची आचारसंहिता २६ किंवा २७ सप्टेंबर रोजी लागण्याची शक्यता आहे. २९ ते ६ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील आणि माघार घेता येणार आहे. मतदान २६ किंवा २७ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता असून २९ ऑक्टोबर रोजी मत मोजणी होणार असल्याची माहिती खास सूत्राने दिली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच विजयी उमेदवारांचे फटाके फुटणार आहेत तर दिवाळीत विजयाचा गुलाल दिवाळीत उधळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.