पोलिसांनी पाठलाग करून घरफोडी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

११ लाख रुपयांचा माल हस्तगत

ठाणे : ठाणे पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या नौैपाडा पोलिसांनी घरफोडी करुन पळून जाणा-या शर्विलकाचा माग घेऊन तब्बल ११ लाख रुपयांचा माल हस्तगत केला आणि त्याला कोठडीचा ‘रस्ता’ दाखवला. मात्र, तत्पूर्वी पोलिसांना त्यांच्यामागे दीड किलोमीटर धावावे लागले.

चोरांनी पळ काढल्यानंतर पोलीस येतात, अशा घटना सिनेमांमध्ये दिसतातच. पण नौपाडा पोलिसांनी याला छेद देऊन नुकत्याच झालेल्या दोन घटनांमधील अट्टल गुन्हेगाराचा पाठलाग करून जेरबंद केले तर दिवसा सोनसाखळी खेचून पळणा-या चोरट्याकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडी करणारे मायासिंग आणि श्याम सिंग हे गुन्ह्यासाठी चोरीची गाडी वापरायचे. घरफोडी करताना रेकी करून, कटावणीने कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत असे. गुजराथमध्ये या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांनी दिली.

खोपट येथील हंस नगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सोने चांदी रोकड मिळून सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. नौपाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. परिसरातील सीसी कॅमेरे बंद होते. जे सुरु होते त्यांचा उपयोग करून पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवली. त्यानुसार, माहिती आधारे मायासिंग सरदार (३४) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीत शामसिंग बावरी (२४) हा आहे, असे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लोंढे यांनी सांगितले.

दोघेही मूळचे गुजरातमध्ये राहणारे आहेत. चोरीच्या दृष्टीने मायासिंग हा ठाण्यात भाड्याची खोली घेऊन रहात होता व सांगोल्यात श्यामसिंग हा रहात असल्याची ‘खबर’पोलिसांना कळली. शामसिंगला सांगोल्यात जाऊन पकडताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लोंढे, सारंग कांगणे, मेहेरबान तडवी, राजेंद्र गायकवाड यांनी अक्षरश: दीड किलोमिटर धावत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जेरबंद केले. त्यांच्याकडून चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे असे पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील म्हणाले.

ठाणे स्थानकाकडे जाणा-या स्कायवॉकवर तिघांनी एका व्यक्तीला धमकावले व सोनसाखळी चोरली. मात्र या व्यक्तीने आरडाओरड केली असता, रिक्षा चालक आणि नागरिकांच्या मदतीने तिघांना पकडले. यावेळी तत्काळ नौपाडा पोलिसांनी येऊन मुद्देमालसह तिघांना ताब्यात घेतले आहे. यातील दोन अल्पवयीन चोरटे आहेत. ऋषिकेश या चोरट्याची चौकशी केली असता यापूर्वीही त्याने सोनसाखळी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.