जल जीवन मिशनमधून पाणी पुरवठा योजना मार्गी
ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातील विविध गावांसाठी लवकरच निविदा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांची अनेक दशकांची पाणी प्रतिक्षा संपली असून या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना राबवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.
ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील पिंपरी कर्म नगरी तर कल्याण तालुक्यातील खोणी (खोणी, खोणी वडवली, खोणी अंताली), म्हारळ बु, पाली अशा एकूण चार योजनांस रु ५.१३ कोटी रकमेची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून या चार योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून मान्सूनपुर्वी या योजना कार्यादेश देऊन कामे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
दरडोई खर्चाच्या निकषांपेक्षा जास्त किंमत असणार या योजनांचा प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत त्याअनुषंगाने कल्याण तालुक्यातील शिरढोण, वडवली (शिरढोण) व अंबरनाथ तालुक्यातील पोसरी शेलार पाडा, चिरड अशा एकूण ३.६८ रुपये किमतीच्या चार योजना दरडोई खर्चाच्या निकषांपेक्षा जास्त असल्याने शासनास प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आल्या आहेत. या योजनांस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यावर निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कार्यादेश देण्यात येतील, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ खुर्द, वरप आणि कांबा अशा एकूण ११.४४ कोटी रकमेच्या तीन योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सादर करण्यात आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत नेवाळी, मांगरूळ खरड, अशा तीन गावे व १४ पाडे मिळून १२.५० कोटी रकमेच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पुढील अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सादर करण्यात आला आहे. या योजनेस सुद्धा तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
कल्याण तालुक्यातील दहिसर घोटेघर योजनेतील बाळे, नारीवली, वाकळण आणि बांभार्ली या चार गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस ३.७८ कोटी रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता जिल्हा पाणी व स्वच्छता समितीकडून देण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यात येतील.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत एकूण ४४.३६ कोटी किंमतीची कामे कल्याण व अंबरनाथ तालुक्यांमध्ये प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे मान्सून पूर्वी सुरू करण्याचे नियोजन आहे.