धोक्याची पातळी ओलांडल्यावर वाजणार अलार्म
ठाणे: पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार ठाण्यात अनेक ठिकाणी घडतात. या पाण्याचा तत्काळ निचरा व्हावा आणि जीवित, वित्तहानी टळावी यासाठी अशा ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या परिसरात सेन्सरही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा अशा भागात संकटाची तीव्रता कमी जाणवेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पाणी साचण्याच्या ठिकाणांची ठाणे महापालिकेने सर्वेक्षण करून एक यादी तयार केली आहे. या ठिकाणी मान्सूनच्या काळात पाणी साचू नये म्हणून आतापासून ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून या सर्व ठिकाणी ५ ते २५ एचपी क्षमतेचे पंप पाणी काढण्यासाठी बसविण्यात येणार आहे.
१४ सखल ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी मान्सूनच्या काळात जर एका विशिष्ट पातळीनंतर पाणी साचू लागल्यास धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजणार आहे. त्यासाठी या ठिकाणी सेन्सर देखील बसविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला या ठिकाणी पाणी साचू लागल्याची सूचना मिळेल. त्यामुळे पुढील उपाययोजना करणे अधिक सुलभतेचे होणार आहे. जेणेकरुन या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोक्याच्या पातळीच्यावर पाणी साचणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे.
मान्सूनच्या काळात पूर परिस्थिती उद्भवल्यास बोटीही महापालिकेने सज्ज ठेवल्या आहेत. यात खाजगी मालकीच्या १७ आणि महापालिकेच्या पाच अशा मिळून एकूण २२ लहान-मोठ्या बोटीचा समावेश असणार आहे. यामध्ये साध्या, पॅडल, मशिन बोट आदींचा यात समावेश असून मशीन बोटमध्ये २५ व्यक्तींचा एकाच वेळी बचाव करता येऊ शकणार आहे. सध्या खाजगी बोटी मासुंदा तलाव येथे कचराळी, हरियाली तलाव जेल तलाव, रेवाळे कोलबाड, कळवा, आंबेघोसाळे, कौसा, खिडकाळी आणि दिवा, दातिवली येथे बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
वंदना टॉकीज, चिखलवाडी भास्कर कॉलनी, डेबोनेअर सोसायटी अल्मेडा रोड, आनंद नगर व्यायाम शाळा कोपरी, आनंद नगर गल्ली क्रमांक एक कोपरी, दादर आळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, लवकुश गृहनिर्माण संस्था, सिडको रेल्वे पूल, क्राइम ब्रांच पोलीस लाईन, पेढ्या मारुती मंदिर, शिवरत्न गल्ली किसन नगर, दत्तवाडी, विटावा रेल्वे पुलाखाली बेलापूर रस्ता आणि दिवा गाव आदी १४ ठिकाणी पाणी तुंबते.