ठाणे – शहराला पुरेसा पाणीसाठा असून देखील शहराच्या काही भागात हवा तसा पाणीपुरवठा केला जात नाही. वागळे इस्टेट येथील प्रभाग क्रमांक १७ व १८ मध्ये देखील अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असून पाण्यासाठी रहिवासी त्रस्त झाले आहेत. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरसेवक राम रेपाळे यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत आणि वाढवून मिळावा अशी मागणी निवेदनात केली. पालिका आयुक्तांनी याची दखल घेत प्रभाग क्रमांक १७ आणि १८ मध्ये ३ एमएलडी पाणी वाढवून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.
वागळे येथील प्रभाग क्र. १८ मध्ये शिवाजी नगर मधील लिना अपार्टमेंट, देवकृपा, प्रतिक अपार्टमेंट, संतोष निवास, नारायण स्मृती, मेघमल्हार, शिव सदन, सुपे सदन, ज्यातीलिंग सदन या इमारती तसेच पडवळ नगरमधील सत्यम शिवम सुंदर, मस्जीद परिसर, अन्नपूर्णा, योगेश्वर धाम, पाकिजा, भरत निवास, सहयोग सदन, विजय निवास, मातृछाया, पितृछाया या इमारतींना बऱ्याच दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील रहिवासी पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या वारंवार तक्रारी स्थानिक नगरसेवकांना येत होत्या.
तसेच, प्रभाग क्र. १७ मध्ये असलेल्या भटवाडी परिसरामध्येही पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने तेथील रहिवासीसुद्धा पाण्यासाठी त्रस्त झालेआहेत. त्यामुळे प्रभाग क्र. १७ व १८ मधील वरील नमुद ठिकाणी बीएमसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करून, ३ एमएलडी पाणी वाढवून देणे आवश्यक असल्याची बाब यावेळी लक्षात आली. त्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिदे यांनी देखील तात्काळ यावर उपयोजना करण्यात यावी अश्या सूचना संबंधीतांना दिल्या असल्याचे रेपाळे यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर अत्यंत तातडीने पाणी पुरवठा होण्यासाठी बीएमसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करून, ३ एमएलडी पाणी वाढवून देण्याबाबत संबंधीतांना आदेश देण्यात आले असल्याचे यावेळी रेपाळे यांनी सांगितले.