माझ्या कारकिर्दीत शाळेने रुजलेल्या मूल्यांचा मोठा वाटा

मो.ह.विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रीकांत वाड यांची कृतज्ञता

ठाणे: माझ्या बॅडमिंटन क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये शाळेचा आणि शाळेने जी मूल्ये आपल्यात रुजवली या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा शब्दांत मो.ह.विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि श्री. शिव छत्रपती जीवन गौरव पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

१३२ वर्षांची शैक्षणिक, सांस्कृतिक उज्ज्वल परंपरा लाभलेले मो.ह. विद्यालय आणि दिव्या स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत क्रीडा प्रबोधिनीचे आयोजन केले गेले. तसेच 1972 सालचे माजी विद्यार्थी श्रीकांत वाड यांना 2019 चा श्री शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेने त्यांचा सत्कार केला. त्यावेळी श्री.वाड बोलत होते.

सत्कारमूर्ती श्रीकांत वाड यांनी आपल्या मनोगतातून आपल्या सर्व माजी शिक्षकांचे आपल्यावर असलेले ऋण व्यक्त केले. खेळाडूंच्या विकासासाठी शिक्षक पालक खेळाडू शाळा यांचा समन्वय असणे गरजेचे आहे असेही सांगितले.
जुन्या आठवणींना उजाळा देत वाड यांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये शाळेचा, शाळेने जी मूल्ये आपल्यात रुजवली या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आवर्जून नमूद केले.
या आधी अनेक सत्कार समारंभ झाले परंतु हा सत्कार सोहळा माझ्यासाठी खास आहे. कारण हा घरचा सत्कार आहे आणि ज्या शाळेने आपल्याला घडवलं, आपल्यावर ज्ञानार्जनासोबतच योग्य ते संस्कार देऊन एक समाजशील माणूस म्हणून जडणघडण केली, त्या शाळेचे आपण आजन्म कृतज्ञ राहू, असे वाड यांनी सर्व लहान मुलांना आपल्या जुन्या आठवणी सांगताना नमूद केले.

शाळेचे ज्येष्ठ शारीरिक शिक्षणाचे माजी शिक्षक गणेश पेंडसे यांच्या हस्ते या क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन केले गेले. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड यांचा सत्कार त्यांचेच शारीरिक शिक्षणाचे माजी शिक्षक श्री. पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला व क्रीडा प्रबोधिनीच्या उद्घाटनाला अध्यक्षपदी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कार्याध्यक्ष आणि शालेय समिती अध्यक्ष शैलेंद्र साळवी, संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र तामरस, संचालक मंडळ सदस्या मेधा जोशी, प्राथमिक शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री.पिंपळे, मुख्याध्यापिका निलांबरी जठार, सुनील पाटील आणि दिव्या स्पोर्ट्सचे अध्यक्ष एकनाथ पवळे आणि अनेक आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे शाही स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी मधुरा सिंहासने (शिवछत्रपती पुरस्कार व क्रीडा प्रशिक्षक), नुबेर शेख (आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बुद्धिबळपटू), एकेंद्र दर्जी (आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्याध्यक्षांनी त्यांचा सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन विशेष सत्कार केला. तसेच सागर डोंबे, तेजस कारखानीस, आकाश अजिवले, निखिल गुंडे यांचाही शाळेने सन्मान चिन्ह आणि पुस्तकरुपी भेट देऊन कौतुक केले.

सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका नीलांबरी जठार यांनी उपस्थितांचे स्वागत केले व भविष्यात या अकॅडमीच्या माध्यमातून नेत्रदीपक कामगिरी करणारे खेळाडू तयार होतील, अशी आशा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे गणेश पेडसे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व भरघोस देणगी दिली.

कार्याध्यक्ष साळवी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्व शिक्षकांचे व छोट्या सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रबोधिनीचा लोगो तयार करणाऱ्या श्री. सोनमोरे यांचे विशेष कौतुक केले. व्यक्तीच्या परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळाचे महत्व विशद केले. यापुढे प्रतिवर्षी या प्रबोधिनीच्या मार्फत एका क्रीडा शिक्षकाचा व खेळाडूचा सत्कार करण्यात येईल, असेही सांगितले. कार्यक्रमाचा समारोप सुनील पाटील यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व यादी वाचन संगीता धनुकटे आणि कविता यादव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.