अवकाळीचा फटका हापूसला

संग्रहित

रत्नागिरी : लांबलेला पाऊस, गायब झालेली थंडी, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि वाढलेला उन्हाचा कडाचा याचा मोठा फटका यंदा कोकणातील प्रमुख पीक असलेल्या हापूस आंब्याला बसला आहे.

कोकणातील शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. ही बाब केवळ यापुरती मर्यादित नसून याचा परिणाम थेट हापूसची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आंबाप्रेमींच्या खिशावर झाला आहे. कारण, कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या कमी झाली आणि दर मात्र चढेच राहिले. त्यामुळे सर्वसामान्याला मात्र हापूसची चव चाखता येणे कठीण झालं आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात दाखल होतात.

सर्वसामान्यांपासून प्रत्येक जण यावेळी आंबा खरेदी करतो. पण, यंदा मात्र अवकाळी आणि वारंवार होत असलेल्या बदलामुळे बाजारात दाखल होणाऱ्या हापूसच्या पेट्यांची संख्या कमी झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यंदा मागील काही वर्षात पाडव्याच्या मुहूर्ताला दाखल झालेल्या हापूसच्या पेट्यांची तुलना केल्यास ही संख्या 30 टक्क्यांनी कमी आहे. कोकणातील काही बागायतदारांनी याची माहिती दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधून पाडव्याच्या दिवशी 21 हजार 290 पेट्या बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे मागील वर्षाची तुलना करता ही संख्या 30 टक्क्यांनी कमी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, बाजारात दाखल होणाऱ्या पेट्यांची संख्या वाढण्यासाठी आणखी किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागण्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

मागील दोन वर्षे कोरोना काळात आंबा ग्राहक आणि बागायतदार हे थेटपणे जोडले गेले. कोरोनाकाळात बाजारात जाण्यास संधी नसल्याने मधले दलाल आणि अडते यांची मक्तेदारी मोडत हापूसची पेटी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचली. परिणामी ग्राहकांना हापूस आंबा बाजारापेक्षा कमी दरात तर बागायतदाराला देखील तुलनेने दोन पैसे जास्त मिळत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हिच बाब यंदा कायम आहे. त्यामुळे थेट ग्राहक ते शेतकरी अशी पद्धत निर्माण झाल्याने देखील बाजारात दाखल होणाऱ्या पेट्यांची संख्या कमी असल्याचं काही बागायतदार सांगतात.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास हजारो हेक्टरवर आंबा बागा असून त्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पण, यंदा मात्र वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा बागायतदार आणि शेतकरी पुरता हवालदिल झालेला दिसून आला. शिवाय वाढलेला उन्हाळा देखील हापूसच्या फळाला मारक ठरताना दिसून आला. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे फळगळ देखील मोठ्या प्रमाणात झाली.