खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा बसखाली येऊन मृत्यू

ठाणे : घोडबंदर रोडवरील खड्ड्याने आज सकाळी एका दुचाकीस्वाराचा जीव घेतला असून या मार्गावरील खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

सुफीयाना शेख असे या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो भाईंदरमध्ये राहतो. आज सकाळी तो दुचाकीवरून जात होता. जोरदार पाऊस पडत असल्याने घोडबंदर मार्गावरील एक मार्गिका पाण्याखाली गेली होती. दोन्ही बाजूची वाहतूक एकाच रस्त्यावरून जात होती. सकाळी १०च्या दरम्यान काजूपाडा येथील रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुचाकीस्वार सुफीयाना शेख हा रस्त्यावर पडला. पाठीमागून बोरिवली येथे जाणाऱ्या एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली तो आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान त्याच ठिकाणी दुपारी खड्ड्यात दुचाकी अडकून एक मोटर सायकलस्वार पडला होता, परंतु पाठीमागून कोणतेही वाहन येत नसल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचल्याचे काशीमीरा पोलिसांचे म्हणणे आहे.

काशीमीरा पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहूनही मार्गावरील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही, त्यामुळे पाणी तुंबून रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्डे बुजवण्यासाठी २४ तास यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. अन्यथा अपघाताचे प्रमाण अधिक वाढेल अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.