सहा महिन्यापूर्वी झाला होता मुलीचा संशयस्पद मृत्यू
कल्याण : डॉक्टरकडून उपचारा दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा दफनभूमीत पुरलेल्या मृतदेहाची काही हाडे बाहेर काढण्यात आली आहेत. कलिनी येथील फॉरेन्सीक लॅबला पाठविली आहेत. लॅब अहवालानंतर मुलीचा मृत्यू कशामुळे झाला ही बाब उघड होणार आहे. या प्रकरणी मयत मुलीच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने आरोपी डॉक्टरसह त्याच्या सहकाऱ्याला अंतरिम जामीन दिला आहे.
कल्याण पूर्व भागातील नवी गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा अचानक आजारी पडली. आई वडिलांनी तिला सूचक नाका येथील डॉ. आलाम यांच्या क्लीनिकमध्ये घेऊन गेले. त्याठिकाणच्या डॉक्टरांनी नेहाला तपासून औषधे दिली. काही तासानंतर नेहाचा मृत्यू झाला. साहानी कुटुंबियांचा आरोप होता की, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला.
दफन करण्यापूर्वी मुलीच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आलेले नव्हते. मात्र कुटुंबियांच्या आरोपाला त्यावेळी आधार नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा दाखल करण्याचे आव्हान होते. परंतु कुटुंबियांनी हे प्रकरण लावून धरले. भाजपच्या जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांनी या कुटुंबियांना मदत केली. कुटुंबियांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी न्यायायलायाच्या आदेशाने संबंधीत डॉक्टरसह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बशीर शेख यांनी तपास सुरु केला.
तपास सुरु असताना दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणात सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणून तपास अधिकारी गोडे, नायब तहसीलदार सुषमा बांगर आणि डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली दफन करण्यात आलेल्या मुलीची काही हाडे बाहेर काढण्यात आली. ती तपासाकरीता फॉरेन्सीक लॅब कलिनाला पाठविली आहेत. पिडीत कुटुंबियांनी आत्ता तरी न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली. कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश पाटील यांचे म्हणणो आहे की, तपास सुरु आहे. योग्य ती कारवाई केली जाईल.