ठाणे : विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे स्वरूप बदलल्याने त्यांना एखाद्या खासगी शाळेत शिकत असल्याची अनुभूती मिळेल, अशी भूमिका घेणाऱ्या ठामपाच्या शिक्षण विभागाने शाळा सुरु होऊन दोन महिने उलटल्यानंतरही गणवेश उपलब्ध करून दिलेले नाहीत. तर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शाळा सुरु झाल्यानंतर वेळेत गणवेश मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. मात्र त्यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
ठाणे महापालिकेच्या प्राथमिक १११ आणि माध्यमिक २३ अशा मिळून १३४ शाळा आहेत. या शाळांमधून सद्यस्थितीत ३५ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा १६ जूनपासून सुरु झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना यापूर्वी डीबीटी पध्दतीनुसार गणवेश उपलब्ध होत होते. विद्यार्थ्यांनी गणवेश घ्यायचा आणि त्याचे बिल शाळेला सादर करायचे. त्यानंतर पैसे पालकांच्या खात्यात जमा होत होते. परंतु यंदापासून पुन्हा ती पध्दत बंद करण्यात येऊन महापालिकेच्या शिक्षण विभागाने गणवेश, चपला, बुट यासाठी निविदा काढली आहे. निविदा काढून जवळ-जवळ तीन महिने उलटून गेले असतांनाही अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश पडलेले नाहीत.
या संदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून निर्णय प्रक्रिया शिल्लक असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. गणवेश, चपला आणि बुट खरेदीसाठी पाच कोटी ६८ लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी देखील अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश पडू शकलेले नाहीत. त्यातही हे गणवेश खरेदी करतांना सुरवातीला जो निविदाकार अंतिम होईल त्याच्याकडून नमुने घेतले जाणार असून त्याची गुणवत्ता व्हिजेटीआयकडून तपासली जाणार आहे. त्यानंतर गणवेश खरेदी केले जाणार आहेत. परंतु या प्रक्रियेला आणखी एक ते दोन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नव्या स्वरूपातील गणवेश देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी राहिली असून विद्यार्थ्यांना गणवेश कसा लवकर मिळेल याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
३५ पैकी १५ हजार विद्यार्थ्यांनी खरेदी केले शैक्षणिक साहित्य
शाळा सुरु होत असतांनाच विद्यार्थ्यांच्या हाती कधी नव्हे ती पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके हाती पडली. तसेच डीबीटी पध्दतीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वह्या, कंपास, इतर साहित्य खरेदी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्याच्या खर्चाची बिले पालिकेला सादर केल्यानंतर त्यांच्या पालकांच्या खात्यात त्याचे पैसे दिले जाणार आहेत. परंतु असे असले तरी देखील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ १५ हजारांच्या आसपास विद्यार्थ्यांनी हे साहित्य खरेदी केल्याचे दिसत आहे. या विद्यार्थ्यांनी खर्चाची बिले सादर केली आहेत. परंतु उर्वरीत विद्यार्थ्यांनी ते अद्याप सादर केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.