माहुली गडावर पाय घसरून ट्रेकर दरीत कोसळला

जीव रक्षकांमुळे सुदैवाने बचावला

शहापूर: शहापूर तालुक्यातील माहुली गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन ट्रेकरपैकी एकाचा पाय घसरल्याने तो दरीत कोसळला. ही माहिती जीवरक्षक टीमला कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या ट्रेकरला सुखरूप बाहेर काढले.

जीवरक्षक टीममधील सदस्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार असे कळते की, माहुली गडावरील शिल्प व इतर ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी नांदेड येथून आलेले कपिल कसबे व सिद्धार्थ हे काही दिवस माहुली गडावर थांबले होते. गडावरील कल्याण दरवाजाकडून भटोबा सुळक्याकडे जातांना कपिल रात्री अडकला होता असे सोबत असलेल्या सिद्धार्थने सांगितले. मागील काही दिवस ते पाण्याचा टाक आहे तिथेच राहत होते. दरम्यान कपिल हा जबर जखमी झाला आहे. अंधार झाल्यामुळे या मोहिमेस अडचण निर्माण होत असल्याची माहिती त्यांनी दिली. रात्री 8.20 नंतरही मोहीम सुरू होती.

जीवरक्षक टीमने आजपर्यंत अनेक लोकांना मरणाच्या दारातून बाहेर काढले असून आजच्या या मोहिमेनंतर या जीवरक्षक टीमचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

रघुनाथ आगीवले, अमित तावडे, अशोक रगडे, तन्मय निमसे, भूषण विशे, आशिष तावडे, प्रदीप गायकर या जीवरक्षक सदस्यांसह मेजर इंगोले, विसपुते आणि दुबळा आदी पोलीस या मोहिमेत सहभागी होते.