वाहतूक अधिकाऱ्याने रिक्षाचालकाकडे मागितली लाच

ठाणे: कोळसेवाडी शाखेच्या वाहतूक अधिकाऱ्याने रिक्षा चालकाकडे मागितली ५०० रुपयांची लाच; व्हिडिओ व्हायरल

कल्याण: पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने रिक्षाचालकाकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाच घेतानाचा व्हिडिओ रिक्षाचालकाच्या मोबाईलमध्ये चित्रीत झाला आहे. या घटनेनंतर संबंधित लाचखोर अधिकाऱ्याची वाहतूक नियंत्रण विभागात बदली करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री चक्कीनाका भागातून जात असताना एका रिक्षा चालकाकडून वाहतुकीचा नियमभंग झाला. चक्कीनाका भागात कर्तव्यावर असलेले वाहतूक विभागाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाने चालकाला थांबण्यास सांगितले. दंडात्मक कारवाईचा इशारा चालकाला दिला. रिक्षा चालक दिवसभराचा व्यवसाय करुन घरी चालला होता. अधिकाऱ्याने चालकाला वाहतूक पोलीस चौकीत नेले. तेथे त्यांनी चालकाकडे ५०० रुपये लाचेची मागणी केली. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगून चालकाने ‘साहेब १०० रुपये घ्या’, असे बोलून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. ‘असे १०० रुपये येणारे जाणारे सहज देऊन जातात. तू ५०० रुपये दे’ असा तगादा अधिकाऱ्याने लावला. हा सगळा प्रकार चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे याची थोडीही जाणीव अधिकाऱ्याला नव्हती. चालक गयावया करुन १०० रुपये घेण्याची मागणी अधिकाऱ्याकडे करत होता. रडकुंडीला येत चालकाने १०० रुपयांची नोट पुन्हा साहेबांपुढे केली. त्यावेळी यामध्ये काय होणार आहे. आणखी थोडी रक्कम टाक असे बोलून अधिकाऱ्याने चालकाला वाढीव रक्कम टाकण्यास सांगितले. २०० रुपयांची रक्कम अधिकाऱ्याने चालकाकडून स्वीकारत असल्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.

रिक्षा चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला लाचखोरीचा प्रकार समाज माध्यमावर प्रसारित केला. दिवसभर याच चित्रफितीची चर्चा सुरू होती. वाहतूक विभागाच्या वरिष्ठांकडे ही चित्रफित पोहचली. अखेर अधिकाऱ्याने लाच स्वीकारुन सेवाशर्तीचा भंग केला म्हणून त्यांची तत्काळ कोळसेवाडी वाहतूक शाखेतून वाहतूक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांची विभागीय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.