ठाणे: ठाणे न्यायालयातील ‘राष्ट्रीय लोक अदालत’न्यायालयात अनेक प्रलंबित प्रकरणे ‘हातावेगळी’ झाली असतानाच, ठाणे वाहतूक पोलिसांकडूनही २७ जुलै २४ रोजी ‘अदालती’च्या माध्यमातून तब्बल पाच कोटी ९० लाख ५३,६५० रुपये इतका दंड गोळा करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या कसूरदार वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचे चलन वाहन नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला करण्यात येतो.
मात्र, अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असून ती प्रकरणे काढण्यासाठी न्यायालयाकडून दर तीन महिन्यांनी राष्ट्रीय अदालतीचे आयोजन केले जाते. संबंधित कालावधीमध्ये जास्तीतजास्त वाहन चालक, सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्यांमध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी होईल कमी होईल याचे महत्व पटवून देण्यात आले आहे.
त्याला अनुसरुन २७ जुलै २०२४ रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
यापूर्वीच हेल्प डेस्कच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाणे वाहतूक विभागातील एकूण १८ युनिटमध्ये दाखल झालेल्या खटल्यांपैकी ८४४४ खटले निकाली काढण्यात आले आहेत आणि ७४ लाख ७५ हजार ०५० इतका दंड (पोस्ट लिटीगेशन) गोळा करण्यात आला आहे.