टाइम्स ऑफ इंडिया संघाला ‘ठाणेवैभव’चे विजेतेपद बहाल

ठाणे : लार्सन टूब्रोने टाईम्स ऑफ इंडिया संघाचा १९ धावांनी पराभव करत ४६ व्या ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली होती. पण टाइम्स ऑफ इंडियाने हरकत घेतल्यानंतर लार्सन टुब्रोचे विजेतेपद काढून ते टाइम्स ऑफ इंडियाला बहाल करण्यात आले.

एका वर्षानंतर ‘ठाणेवैभव’चे आयोजक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते टाइम्स ऑफ इंडियाचा कर्णधार शेखर कदम आणि टाइम्स ऑफ इंडिया क्रिकेट क्लबचे सचिव आशिष सावंत यांना विजेतेपदाचा पुरस्कार बहाल करण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाला विजेतेपद मिळाल्याबद्दल टाइम्स ऑफ इंडिया क्रिकेट क्लबचे चेअरमन डॉ. आर. वेंकट केशवन यांनी संघाचे अभिनंदन केले आणि पुढील सिझनमध्ये अशीच कामगिरी कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या वर्षी 16 मे 2022 रोजी सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत लार्सन टूर्बो संघाने प्रथम फलंदाजी करत १९.५ षटकात १४८ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभे केले. शिवा यादवने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करताना आठ चौकारानीशी ४७ चेंडूत ५५ धावा करत संघाच्या एकूण धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. राहुल जोशीने २७ धावा केल्या. पंकज सावंतने गोलंदाजीत छाप पाडताना ४ षटकात एका निर्धाव षटकासह १८ धावांत ३ फलंदाज बाद केले. हृषिकेश नरे आणि अनिर्बन चौधरीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. अंकित गांधी, परितोष मोहिते, सत्यजित बॅनर्जीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रथमेश आणि परितोष मोहितेने दमदार फलंदाजी करत संघाला विजयाची आस दाखवली. गोलंदाजीप्रमाणे फलदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करताना हृषिकेशने नाबाद २४ धावा केल्या. प्रथमेशने ३१ आणि परितोषने ४० धावा केल्या. या तिघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज धावा उभारण्यात अपयशी ठरल्याने टाइम्स ऑफ इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. सुशांत शेट्टी आणि जतिन सेठीने मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवत संघाला विजयाच्या नजीक नेले. सिद्धेश चव्हाण, जगदीश सोरखडे आणि सचिन आहुजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

टाइम्स ऑफ इंडियाकडून संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी पंकज सावंत याला बेस्ट बॉलरचा किताब देण्यात आला. तर राकेश पुतरन याला तीन सामन्यात नाबाद राहिल्याबद्दल बेस्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. आर. वेंकट केशवन आणि आशिष सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन

यावेळी टाइम्स ऑफ इंडिया क्रिकेट क्लबचे चेअरमन डॉ. आर. वेंकट केशवन उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या ७-८ वर्षांपासून टाइम्स ऑफ इंडियाच्या संघाने चांगली प्रगती केली आहे. त्यांचा खेळाडूंना कायम पाठिंबा राहिला आहे. आजच्या पराभवानंतरही टीमचे मनोधैर्य उंचविण्यासाठी डॉ. आर. वेंकट केशवन ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर उपस्थित होते. यावेळी टाइम्स ऑफ इंडिया क्रिकेट क्लबचे जॉइंट सेक्रेटरी आणि माजी कर्णधार आशिष सावंत यांनी टीमला फायनलपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. स्वतः गेली २५ वर्ष संघाचा भाग आणि आता मॅनेजमेंटमध्ये गेली १० वर्षांपासून सक्रिय असलेल्या सावंत यांनी आपल्या अनुभवाचा फायदा संघाला करून दिला आहे.