ठाणे : ठाणे आणि बोरीवली यांना जोडणा-या बोगदा प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची अद्याप परवानगी मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प साडेसात वर्षे रखडल्याचे ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी सांगितले.
तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सन 2015 मध्ये घोषित केलेला हा बोगदामार्ग एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या परिसरातून जाणारा आहे. त्यामुळे वन विभागाची मंजुरी अत्यावश्यक आहे. मात्र त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारने गेल्या वर्षी पाच महिन्यांनी केंद्राकडे पाठवला. सध्या ठाणे आणि बोरिवली या दीड तासांचा प्रवास अवघ्या वीस मिनिटांवर येणार आहे. या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण आणि वनविभागाची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या संपूर्ण प्रकल्पाला 15 हजार कोटी खर्च येणार असल्याची चर्चा आहे.
घोडबंदर रस्त्यावरील भीषण वाहतुकीच्या कोंडीवर हा एकच मार्ग आहे. सध्या ठाण्याहून बोरिवलीकडे जाताना संपूर्ण घोडबंदर रस्त्याला वळसा घालावा लागतो. त्यामुळे दररोज असंख्य प्रवाशांचा दीड ते दोन तासांचा प्रवास टाळण्यासाठी संजय गांधी उद्यानाच्या टेकडीकडून बोगदा तयार करण्याचे एमएमआरडीएचे एकमेव नियोजन आहे. या भागात 18 जातीच्या संरक्षित वन्यजीवांचा अधिवास तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात एकूण 248 जातीचे पक्षी, 43 प्रकारचे सस्तन प्राणी आणि 38 प्रकारच्या सरपटणा-या प्राण्यांचा अधिवास आहे. हा बोगदा ठाणे ते बोरिवली दरम्यान 5.74 किलोमीटर व बोरिवली ते ठाण्याच्या दरम्यान 6.01 किलोमीटर लांबीचा आहे. दोन्हीकडे असलेला जोड रस्ता एक पॉईंट 55 किलोमीटरचा असेल. जवळपास दहा किलोमीटरचा मार्ग अभयारण्याच्या 25 मीटर खालून जाणार आहे. त्यासाठीच्या परवानगीचा प्रस्ताव एमएमआरडीएने मे 2023 मध्ये राज्य सरकारच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दिला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारने आॅक्टोबरमध्ये केंद्राकडे पाठवला होता.
या बोगदा बांधकामाचे कंत्राट ‘मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ला देण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे कंत्राटदाराने कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक केली. मात्र वन विभाग परवानगीची अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे काम सुरू झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.