ठामपा आयुक्तांनी नामफलकात दिले आईला स्थान

ठाणे : यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मानाचे स्थान देणार्‍या ठाणे महापालिका आयुक्तांनी महिला सन्मानाची सुरुवात स्वतःपासून केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपल्या दालनाबाहेरील नामफलक बदलले असून त्यामध्ये आपल्या आईच्या नावाचाही समावेश केला आहे.

ठाणे पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आतापर्यंत अभिजीत बांगर असे नामफलक होते. हे नामफलक त्यांनी मंगळवारी बदलून अभिजीत छाया सुधाकर बांगर असे केले आहे. आई-वडीलांप्रती असलेली कृतज्ञता आणि सन्मान या नामफलकातून दिसत आहे. संपूर्ण पालिका आयुक्तालयात अशाप्रकारचा नामफलक नाही. पण आयुक्तांनीच हा नवीन पायंडा सुरू केल्याने सर्व अधिकार्‍यांना ते प्रेरणादायी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे पालिकेवर प्रशासक असला तरी मुख्यमंत्र्यांचे ठाणे असल्याने राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. यामुळे त्रस्त होऊन इतर आस्थापनेमध्ये आपली बदली केली जावी यासाठी ठाणे पालिका आयुक्त् अभिजीत बांगर प्रयत्नशिल असल्याची चर्चा मध्यंतरी पालिका वर्तुळात रंगत होती. इतकेच नव्हे तर लवकरच त्यांची बदली पुणे, पिंपरी-चिंचवड येथे होणार असल्याची चर्चाही जोर धरू लागली होती. यादरम्यान झालेल्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमांमध्ये बांगर यांच्या कार्याचे कौतूक मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यामुळे नक्की आयुक्तांची बदली होणार की नाही अशी शंका अधिकारी, ठेकेदारांपासून राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. पण आपल्या नावाचे फलक बदलून सध्यातरी या चर्चेला खुद्द अभिजीत बांगर यांनीच पूर्णविराम दिल्याचे बोलले जात आहे.