ठाकरे गटाने दरेकरांना उमेदवारी देत टाकला सहानुभूतीचा पत्ता

ठाणे: शिवसेना ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघात वैशाली दरेकर यांना उमेदवारी देत पहिली बाजी मारली आहे. दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात महिला उमेदवार दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाने तुर्तास निश्वास सोडला आहे. पण चैत्र नवरात्रौत्सवाआधी महिला शक्तीला रिंगणात उतरवल्याने उद्धव ठाकरे यांनी या निमित्त निष्ठेसह सहानभुतीचे कार्ड खेळल्याचे दिसते. या मतदार संघातील नारी शक्ती निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख १८ हजार ९५८ मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या ही नऊ लाख ३२,५१० आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कल्याणमध्ये महिला मतदार कल्याणचा सुभेदार ठराविणार आहेत. प्रचार जसजसा रंग धरेल तस तसे ताई, माई, अक्का… विचार करा पक्का.. अशी हाक ऐकायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यातच अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. या तिढ्यामध्ये कल्याणचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदेही अधांतरी आहेत. कल्याणमध्येच विजयाची हॅट्रीक मारायला मिळणार की ठाणे लोकसभा मतदारसंघात जावे लागणार याचा निर्णय बाकी आहे. असे असले तरी त्यांना कल्याणमधूनच उमेदवारी मिळेल हे गृहित धरून आपली मार्चेबांधणी सुरू केली आहे.

ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे, केदार दिघे आणि वरुण सरदेसाई यांच्या नावापैकी एकाला उमेदवारी मिळणार असा राजकीय निरीक्षकांचा कयास होता. या सर्व घडामोडीमध्ये उद्वव ठाकरे यांच्या शिवसेनेने कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशााली दरेकर यांना उमेदवारी जाहिर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. परंतु त्यांची उमेदवारी जाहिर होताच समाजमाध्यमांवर शिंदे गटाने ‘विजयाची हॅट्रीक आम्हीच मारणार’ अशा आशयाचे संदेश प्रसारित करू लागले त्यामुळे शिवसेना शिंदे गट वैशाली दरेकर यांना सध्या हलक्यात घेत असल्याचे यावरून दिसते.

कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोट्यवधींचा विकास निधी आणला आहे. अनेक विकासप्रकल्प त्यांच्यामुळे येथे मार्गी लागले आहेत. एक सुशिक्षित युवा चेहरा आहे. त्यात ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पदाधिकार्‍यांची आणि माजी नगरसेवकांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. भाजपचा या मतदारसंघावर दावा असला तरी खासदार शिंदे यांचे फारसे भाजप आमदारांसोबत पटत नसले तरी मोदींना जिंकून देण्यासाठी संघाची मते व भाजपची मते डॉ. शिंदे यांच्या पारड्यात पडू शकतात. तर दुसरीकडे शिवसेना, मनसे पुन्हा शिवसेना असा प्रवास करणार्‍या वैशाली दरेकर यांनी शिवसेनेत गट पडल्यानंरही ठाकरेंची साथ सोडली नाही. लोकसभा निवडणुकीचा असलेला अनुभव ही वैशाली दरेकर यांची जमेची बाजू असेही म्हणता येईल. २००९ साली त्यांनी मनसेच्या तिकिटावर येथून निवडणूक लढवून लाखभर मते मिळवली होती. सर्वाधिक मते घेणार्‍या यादीत त्या तिसर्‍या क्रमांकावर होत्या. कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्यांनी विरोधीपक्ष नेत्या म्हणूनही जबाबदारी पार पाडली. एक सुशिक्षित आणि अभ्यासू चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

दोन शिवसेना अन् महिला कार्ड
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर बहूतके पदाधिकारी शिंदे गटात गेले असले तरी मतदार आणि शिवसैनिक ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे कल्याणा लोकसभा निवडणुकीत दोन शिवसेनेत प्रमुख लढत होईल असे सध्याचे तरी चित्र दिसत आहे. हे गृहित धरून निष्ठेसोबत सहानुभूतीही मतांच्या रुपात मिळवण्याचा ठाकरे यांचा येथे प्रयत्न दिसतो. त्यासाठी महिला मतदारांना डोळयासमोर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गट महिला कार्ड खेळणार हे निश्चत होते. त्यासाठी सुशमा अंधारे हे नाव चर्चेत होते. पण संघविचारसरणीचा हा मतदारसंघ असल्याने अंधारे यांना कितपत यश मिळेल याची शाश्वती नव्हती. अखेर अभ्यासू चेहरा म्हणून वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी महिला उमेदवारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदारांनाच संधी मिळाली तर भाजपचा एक नाराज गट अप्रत्यक्षपणे सुलभा गायकवाड यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.