भाजपा आणि शिवसेनेचे एकमेकांवर दबावतंत्र
ठाणे : नवी मुंबईत मंत्री केसरकर यांनी ठाण्याची जागा धनुष्यबाणावरच लढणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला असताना ठाण्यात भाजपचे संजीव नाईक यांनी शिवसेनेकडून अशी कोणतीही ऑफर नसल्याचे सांगून भाजपाच ही जागा लढवणार असे संकेत दिले आहेत. दोन्ही पक्षांकडून दबावतंत्र वापरण्यात येत असले तरी ठाणे आणि कल्याणचा उमेदवार कोण हे उद्याच्या महायुतीच्या प्रचारसभेतच जाहीर होणार आहे.
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने ठाण्यात उमेदवाराशिवायच महायुतीची पहिली प्रचारसभा उद्या होणार आहे. ठाण्यातील टीप-टॉप प्लाझा या ठिकाणी ही सभा होणार असून नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवण्याचा निर्धार या प्रचार सभेमध्ये करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीने यापूर्वीच प्रचारामध्ये आघाडी घेतली असून उबाठा पक्षाच्या वतीने राजन विचारे यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी माजिवडा या ठिकाणी आघाडीची प्रचारसभा झाली असून या प्रचार सभेसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, धर्मराज्य आणि आम आदमी पक्षाचे मान्यवर नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या लोकसभा मतदार संघातील निवडणुकांना अजून वेळ असला तरी ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाणे लोकसभेवर अजूनही भाजपने आपला दावा सोडलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी अजूनही भाजप आणि शिवसेनेला आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. या लोकसभा मतदार संघासाठी चार ते पाच नावांची दररोज चर्चा असून उमेदवार अद्याप निश्चित होत नाही. आज महायुतीची पहिलीच प्रचार सभा ठाण्यातील टीप-टॉप प्लाझा या ठिकाणी होणार असून या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेतच उमेदवारांचा सस्पेन्स संपणार आहे.
दरम्यान मंगळवारी संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. नाईक यांच्या या ‘ठाणे’वारीमुळे नाईक हे देखील ठाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत दिले आहेत. नाईक यांनी ठाणे लोकसभा धन्युष्यबाण या चिन्हावर लढावी अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र अशाप्रकारची कोणतीही ऑफर आपल्याला नव्हती, असा खुलासा संजीव नाईक यांनी केला आहे. तर उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. आमची महायुती आहे. मला विश्वास आहे की येथील खासदार हा पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचे यावेळी नाईक म्हणाले. जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असे वक्तव्यही यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ काढावा अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
ठाण्यात नाईक की सरनाईक या प्रश्नावरही त्यांनी वरिष्ठ पातळीवरील निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता आम्हाला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे. सध्या तो वाढवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष प्रयत्नशील असल्याचे नाईक म्हणाले. ठाणे लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असेल. मात्र तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत. कार्यकर्ते देखील समजूतदार असून एकजुटीने महायुतीमध्ये काम करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.