मर्जिया पठाण यांचा पाहणी दौरा
ठाणे : उत्तर प्रदेशमधील संभळ येथे मस्जिद सर्वेक्षणाच्या नावाखाली निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीवर ताशेरे ओढत, मुंब्र्याच्या सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांनी तेथील परिस्थितीला नियोजित षड्यंत्र म्हटले आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या संभळ दौऱ्यादरम्यान पीडितांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथांना वाट मोकळी करून दिली.
मर्जिया शानू पठाण म्हणाल्या की, “संभळमधील स्थिती पाहून डोळ्यांत पाणी येते. धर्माच्या नावाखाली निर्माण केलेला हा वाद सरकारच्या संमतीने घडवला गेला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा खेळ रंगला आहे आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार करून बहुसंख्यक समाजाला चिथावण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.”
संभळमधील मस्जिद परिसराचा दौरा करून मर्जिया यांनी सांगितले की, “हिंदू-मुस्लिम शतकानुशतके शांततेत राहात होते, पण अचानक, मस्जिद सर्वेक्षणाच्या नावाखाली या शांततामय समाजात तेढ निर्माण करण्यात आली आहे. स्थानिक मुस्लीम समुदाय भयभीत असून, अनेक कुटुंबांतील पुरुष बेपत्ता आहेत. महिलांना मानसिक त्रास दिला जात आहे, तर मस्जिदीभोवती पोलीस फौज तैनात आहे.”
तिथल्या वृद्ध महिलांशी संवाद साधताना मर्जिया पठाण म्हणाल्या की, “संभळ ही ऐतिहासिक नगरी आहे, जिथे हिंदू-मुस्लिम समुदाय प्रेमाने नांदत होते. पण आता परिस्थिती अशी आहे की, कोणत्या क्षणी कोणाला उचलून नेले जाईल किंवा कोणाचे घर उद्ध्वस्त केले जाईल, हे सांगता येत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
योगी सरकार मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या अपयशांवर पांघरूण घालण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाच्या दंगली घडवत आहे. लोकांनी हक्क मागू नये म्हणून त्यांना धर्माच्या नावावर गुंतवून ठेवले जात आहे, असा आरोप मर्जिया पठाण यांनी केला.
मर्जिया पठाण पुढे म्हणाल्या की, “ही परिस्थिती देशातील निष्पक्ष जनतेसमोर यायला हवी. आम्ही शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या धर्मनिरपेक्ष नेत्यांना भेटून हे मुद्दे संसदेत मांडण्याची विनंती करू.”
संभळमधील स्थिती आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी मर्जिया शानू पठाण यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.