पालक आंदोलनाच्या तयारीत
ठाणे : शाळा सुरु झाल्यानंतरही पालिका शाळेतील कैद्यांचा विलगिकरण कक्ष सुरूच आहे. त्यामुळे शाळेत पोलीस आणि कैदी बघून विद्यार्थी घाबरत आहेत. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
मागील काळात महानगरपालिकांच्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत होत्या. विटावा येथील ७२ क्रमांकाची शाळा कोविड सेंटर म्हणून जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली होती. शाळेचे रूपांतर कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष अशा दोन भागात केले होते. गेल्या वर्षी ठाणे मध्यवर्ती कारागृहात कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. ज्या कैद्यांचे अथवा न्यायबंदीचे अहवाल सकारात्मक असतील त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये केली जायची आणि ज्याचे अहवाल निगेटिव्ह असतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात १४ दिवसांसाठी करण्यात येत होती. बाधित असलेल्या कैद्यावर शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचार करून त्याचा अहवाल नकारात्मक येईपर्यंत ठेवण्यात येत होते.
दोन वर्षानंतर कोरोनाची लाट काही प्रमाणात ओसरली असली तरी विटावा येथील कैद्यांसाठी सूरू करण्यात आलेला विलगीकरण कक्ष अद्याप बंद करण्यात आलेला नाही. कच्चे कैदी ठेवण्यासाठी अद्याप या शाळेच्या वर्गांचा उपयोग जिल्हा कारागृह प्रशासनाकडून होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांचे पालक देत आहेत. एकीकडे शाळा सुरू असून या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग नियमित भरत आहेत. या ठिकाणीं कैदी आणि पोलिसांचा नियमित वावर पाहून बालमनावर त्याचा परिणाम होत असल्याचे पापकांचे म्हणणे असून ते चिंता व्यक्त करत आहेत. या संदर्भात शाळेच्या वरिष्ठ शिक्षकांनी अनेकदा अर्ज विनंती करूनही प्रशासन स्तरावर प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षकही मेटाकुटीस आले आहेत. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी पोलीस कैद्यांची ने-आण करत असतात. या संदर्भात पालकांनीही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश येत नसल्याने पालक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
माझा मुलगा दोन वर्षांपासून या शाळेत शिकतो. मुलांच्या समोरच कैद्यांची ने-आण सुरु असते. हे सर्व मुले पाहतात. गेल्या काही महिन्यांपासून हा कक्ष हलवण्यात यावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत असून प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे पालक रेणुका बनसोडे यांनी सांगितले.