राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

ठाणे : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप संपुष्टात आला आहे. संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.

निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. सकारात्मक आज आमची चर्चा डॉक्टरांसोबत झाली आहे. त्यांनी आता संप मागे घेतला असल्याचे महाजन यांनी सांगितले. आंदोलन करण्यापूर्वी मला भेटा असे देखील मी त्यांना सांगितले आहे. आधी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी सांगितले की, वसतिगृहासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटींच्या निधी मागितला आहे. त्याशिवाय, सीएसआर अंतर्गत निधीची मागणी कॉर्पोरेट क्षेत्राकडे करण्यात आली आहे. त्यांनीदेखील सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. दोन दिवसांत एक हजार 432 पदे भरली जाणार आहे. या भरतीचा प्रस्ताव याआधीच होता. त्याला अधिक गती येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले. महापालिका अखत्यारीत असलेल्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्याकडे याची चर्चा करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. या बैठकीत संबंधित अधिकारीदेखील असतील.

निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ.अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, आज आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही संप मागे घेत आहोत. निवासी डॉक्टरांचा संप आता मागे घेतला आहे. आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. त्यामुळे संप मागे घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मार्डने आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. एक जानेवारीपर्यंत सरकारने मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी दोन जानेवारीपासून संप पुकारला होता. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले होते. आज राज्य सरकारसोबत चर्चा झाली नसती तर उद्यापासून, बुधवारपासून अत्यावश्यक विभागात सेवेत असणाऱ्या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता.