टॉय ट्रेनला प्रचंड प्रतिसाद
ठाणे : यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील पर्यटकांनी माथेरानला पसंती दिल्याने मध्य रेल्वेच्या महसुलात लक्षणीय भर पडली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरपासून पर्यटकांची पावले गिरीस्थान माथेरान, लोणावळ्याकडे वळली. त्यातही माथेरानमध्ये हजेरी लावलेल्या तब्बल ३.०४ लाख प्रवाशांमुळे ‘म.रे’ला २.२४ कोटींचा महसूल प्राप्त झाला.
गेल्या २०२२ च्या शेवटच्या चार महिन्यांमध्ये महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेशातील पर्यटकांनी स्थानिक आणि राजस्थान, हिमाचल प्रदेश व काश्मिर आदी राज्यांतील पर्यटनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे या व्यवसायाला यावर्षी ‘चार चाँद’ लागले आहेत. या क्षेत्रातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या इतर अनेक व्यावसायिकांनाही जुन डिसेंबरनंतर ‘अच्छे दिन’ आल्याने ते खुषीत होते, अशी माहिती ठाणे-मुंबईतील ‘संयोग टूर्स’चे संचालक योगेश लेले आणि संदीप भुजबळ यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
गेल्या वर्षी एकूण ३ लाख ४ हजार १९५ प्रवाशांना माथेरानचा प्रवास घडविण्यात आला. त्यात एप्रिल ते डिसेंबर-२०२२ कालावधीत अमन लॉज आणि माथेरान दरम्यान २ लाख ७६ हजार ९७९ आणि आॅक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत नेरळ आणि माथेरान दरम्यानच्या २७ हजार २१६ प्रवाशांचा समावेश आहे.
या सेवेमुळे मिळालेले एकूण नोंदणीकृत महसूल रु. २ कोटी २० लाख ९० हजार २० आहे. त्यात अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर २२ या कालावधीत १ कोटी ८६ लाख ६३ हजार ३४८ रुपये आणि ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत माथेरान-नेरळ दरम्यान ३४ लाख २६ हजार ६७२ रुपये याव्यतिरिक्त या विभागात एकूण १० हजार ९८३ पॅकेजेसची पार्सल वाहतूक करण्यात आल्यामुळे म. रेल्वेला यातून ३ लाख ०४ हजार ३२५ रुपयांचा महसूल नोंदवला गेला.
यामध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत ७ हजार ६१८ पॅकेजेसचा समावेश आहे. यातून २ लाख ७९ हजार ८२३ रुपये महसूल मिळाला. आॅक्टोबर ते डिसेंबर २२ या कालावधीत नेरळ आणि माथेरान दरम्यान ३ हजार ३६५ पॅकेजेसमधून २४ हजार ५०२ रुपये महसूलाची नोंदणी झाली आहे.