डेब्रिजपासून खडी निर्मितीचा प्रकल्प फसला

ठाणे : कोट्यवधी रुपये खर्च करून डायघर येथे सुरु करण्यात आलेला डेब्रिजपासून खडी निर्मितीचा प्रकल्प फसला असून रस्त्यावरील डेब्रिजही उचललेच जात नसल्याची बाब पालिका आयुक्तांच्याच दौऱ्यात उघड झाली आहे.

शहरातील डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथे पालिकेने प्रक्रिया केंद्र सुरु केले होते. हे काम ज्या एजन्सीच्या कारभाराचे धिंडवडे आधीच निघाले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका चांगलीच अडचणीत आली आहे. शहरातील डेब्रिज उचलण्यासाठी तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठाणे महापालिकेने आतापर्यंत या एजन्सीला तब्बल आठ कोटी रुपये मोजले, मात्र शहरातील डेब्रिज उचललेच जात नसून ज्या ठिकाणी डेब्रिज उचलले गेले आहे त्या संबंधित नागरिकांकडूनच पैसे उकळले असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला होता.

शहरातील डेब्रिज उचलून डायघर येथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीट, पेव्हर ब्लॉक अशा वस्तू बनवल्या जाणे अपेक्षित आहे. मात्र ज्या एजन्सीला हे काम देण्यात आले त्या एजन्सीला डेब्रिज उचलणे, ते डायघर पर्यंत घेऊन जाणे आणि त्यावर प्रक्रिया करणे अशा एकूण कामासाठी प्रति टन १०५० रुपये आकारण्यात येत आहेत. मात्र अजूनही शहरात बऱ्याच ठिकाणी डेब्रिज उचलले जात नसून ज्या ठिकाणी डेब्रिज उचलले जात नसल्याची माहिती उघड झाली आहे. अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या गाड्या जात नसल्याने डेब्रिज वेळेवर उचलले जात नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डेब्रिजपासून वीट, पेव्हर ब्लॉक अशा वस्तू बनवल्या जाणे अपेक्षित होते, मात्र प्रकल्पाचा उद्देशच फसला आहे.