स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात चाचा नेहरूंचा पुतळा अडगळीत

ठाणे : देशात आणि राज्यात महापालिकांमार्फत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. मात्र देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आंबेघोसाळे तलाव येथील पुतळ्याची दुरवस्था झाली असून येथील अस्वच्छता आणि दुर्गंधीकडे ठामपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे उघडकीस आले आहे.

मिनाताई ठाकरे चौक येथील आंबेघोसाळे तलावाच्या परिसरात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा काही वर्षांपूर्वी महापालिकेने उभारला आहे. या पुतळ्याची सद्या दुरवस्था झाली आहे. पुतळ्याच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. संरक्षक जाळ्या तुटल्या असून या पुतळ्याच्या संरक्षणासाठी सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी या परिससरात गर्दुल्ले बसत आहेत.  ठाणे महापालिका ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च करत आहे. त्यांनी थोडा निधी या पुतळ्याच्या रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासाठी सुद्धा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेकांनी लढा दिला होता. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे महापालिका प्रशासनाने १५ ऑगस्टपूर्वी पुतळ्याच्या परिसराची साफसफाई, रंगरंगोटी, संरक्षक जाळी आदी कामे केली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे बाबू यादव यांनी दिला आहे.