रखडलेल्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार

ऑगस्टमध्ये ओबीसी आरक्षणाचा निकाल

मुंबई: राज्यातील रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? असा प्रश्न पडलेला असताना राज्यातील महापालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होतील, अशा प्रकारचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ऑगस्टमध्ये त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्या राज्यातील सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाला आणि आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका होतील अशी शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यानुसार जोरदार तयारीला लागतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. जुलै महिन्यात पुढची तारीख आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत निकाल येणे अपेक्षित असून त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे. खरंतर महापालिकेच्या निवडणुका सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणखी पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.

कर्नाटक विधानसभा निवडणुकात झालेला भाजपचा पराभव आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाबद्दल उसळलेली सहानुभूतीची लाट…हे पाहता तातडीने निवडणुका घेणे हे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसाठी राजकीयदृष्ट्या अनुकूल वातावरण नसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे रखडलेल्या राज्यातील 24 महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जर जाहीर झाल्या तर तोपर्यंत राजकीयदृष्ट्या अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून केला जाईल.

महापालिका निवडणुकीत फायदा कोणाला?
ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यास तर अवघे पाच महिने हे सर्व पक्षांच्या हातात निवडणुकांच्या तयारीसाठी असणार आहेत. खरंतर निवडणुका जरी रखडलेल्या असल्या तरी अगदी तळागाळात जाऊन सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या सगळ्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सहानुभूतीचा फायदा कितपत होतो आणि सत्ताधारी असल्याचा फायदा कशाप्रकारे उचलला जाईल हे निवडणुका जाहीर झाल्यानंतरच कळेल.