मेट्रो धावण्याआधीच स्थानक नामांतराला वेग

घोडबंदरचे ग्रामस्थ आक्रमक

ठाणे : मुंबई मेट्रो क्र. ४ वडाळा ते वडवली या मार्गिकेवर होणाऱ्या स्थानकांच्या नावांबाबत स्थानिक भूमीपुत्रांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओवळा, भाईंदरपाडा आणि वाघबीळ या नावांबाबत ग्रामस्थ ठाम असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत मेट्रो – ४ या वडाळा ते कासारवडवली या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर घोडबंदर रोड भागात ओवळा, भाईंदरपाङा, वाघबीळ येथे मेट्रो स्थानके होणार आहेत. या प्रस्तावित स्थानकांना मेट्रो प्राधिकरणामार्फत ‘गोवणीपाडा’, विजय गार्डन आणि नागला ही नावे देण्याचे प्रस्तावित आहे. या नावांबाबत स्थानिक नागरिक, भूमीपुत्र आणि ज्येष्ठ नागरिकानी नापसंती दर्शवली आहे. या स्थानकांना ओवळा, भाईंदरपाडा आणि वाघबिळ ही नावे देण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.
घोडबंदर रोड, भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकासाला गती मिळाली आहे. घोडबंदर परिसरातील मूळ स्थानिक भुमीपुत्रांच्या जमिनीवर विकास होत आहे. येथील भूमीपुत्रांनी गरजेपोटी आपल्या शेतजमिनी कवडीमोल किमतीत विकासकांना दिल्या. तेव्हा, खऱ्या अर्थाने येथील सर्वांगीण विकासाला उत्तम गती देण्याचे काम स्थानिक भुमीपुत्रांनी आपले सर्वस्व देऊन केले आहे. परंतु, आज शासनाचे वेगवेगळे नागरी सुविधा प्रकल्प होत असताना त्या प्रकल्पांना स्थानिक गावांची नावे दिली जात नाहीत. त्यामुळे येथील भुमीपुत्रांवर अन्याय होत असल्याची भावना प्रत्येक गावागावात निर्माण झाली आहे, अशी भावना ओवळेकर यांनी व्यक्त केली आहे. या मेट्रो स्थानकांना ओवळा, भाईंदरपाडा आणि वाघबिळ अशी नावे देण्यात यावीत अशी मागणी करत ओवळेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.