कमी वजनाच्या बालकांसाठी एसएनसीयू कक्ष ठरले देवदूत

सिव्हिल’च्या प्रसूतीगृहात ११ महिन्यांत एक किलोपेक्षा कमी वजनाच्या ३६ मुलांचा जन्म

ठाणे : गेल्या ११ महिन्यांत एक किलोपेक्षा कमी वजनांच्या ३६ मुलांचा जन्म प्रसूतीगृहात आहेत. येथील ‘एसएनसीयू’ कक्ष बाळांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यापैकी ब-याच बाळांचीही तब्येत सुधारली आहे आणि बाळ घरी सुखरूप जात आहेत.

ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात आहे, असे वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी सांगितले.

प्रसूतीगृहात अत्याधुनिक साधन असून, एखादे बाळ कमी वजनाच्या जन्माला आलेच तर त्याच्यासाठी स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट (एसएनसीयू कक्ष) या ठिकाणी ठेवला आहे. आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही यादृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत. एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या ‘एसएनसीयू’ मधे काळजी घेतली जाते. यामध्ये डॉ. राहुल गुरव, डॉ. शैलेश गोपनपल्लिकर, डॉ. प्रकाश बोरुळकर, वरिष्ठ परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी अथक परिश्रम करतात.

एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यावर त्याची प्रतिकार शक्ती कमी असते. याबरोबर कावीळ, श्वसन त्रास, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा बाळांचा सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्यावरच असते. मात्र असे असले तरीही, ‘एसएनसी’यू मधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेत असतात. त्यामुळेच कमी वजनांची मुलेही सुखरूप असतात,असे डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे) यांनी सांगितले.

प्रसूतीगृहात मे महिन्यात एक बाळ जन्माला आले. त्याचे जन्मत:च वजन अवघे ६५० ग्रॅम होते. त्यामुळे अशा बाळांची काळजी घेणे रुग्णालयाच्या दृष्टीने तारेवरची कसरत असते. बाळ जवळपास दीड महिना प्रसूतीगृहातील ‘एसएनसीयू’ कक्षात होते. बाळाची प्रकृती सुधारल्यावर घरी पाठवण्यात आले. सहा महिन्यात या बाळाचे वजन साडेतीन किलो झाले आहे, असे डॉ. सुरेश वानखेडे ( वरिष्ठ बालरोग तज्ञ) म्हणाले.

खाजगी प्रसूतीगृहांपेक्षा सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतीगृह खूप चांगला आहे. येथे मिळणा-या सोयी-सुविधा उत्तम आहेत आणि आई आणि बाळाची येथे योग्य ती काळजी घेतात,अशी प्रशंसा भिवंडी येथील प्रमिला शर्मा यांनीही केली.