ठाणे : गोव्यातील दारू बेकायदा पद्धतीने टेम्पोमध्ये भरून गुजरातला नेण्याचा डाव राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभागाच्या पथकाने भिवंडीत उधळून लावला. या टेम्पोत लिक्विड सोपच्या पँकिंगमध्ये दारूच्या तब्बल १९९० बाटल्या सापडल्या. ही सर्व गोवा बनावटीची दारू गुजरातच्या बडोद्याला नेली जात होती. यावेळी भिवंडी – चिंचोटी रस्त्यावर हा टेम्पो अडवून ५५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा पद्धतीने तस्करी वारंवार होत असते. अशाच पद्धतीने दारूच्या तस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाला मिळाली होती. ठाणे विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे व उप अधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भिवंडी – चिंचोटी मार्गावर सापळा रचला होता. खारबाव खाडीपुलावर आलेल्या एका संशयित टेम्पोला पथकाने अडवले. या टेम्पोमध्ये लिक्विड सोपचे बॉक्स होते. भरारी पथकाच्या कर्मचाऱ्याने बॉक्स उघडून पहिले असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. या प्रकरणी चालक संदीप पंडित (३७) याला अटक करण्यात आली आहे.