१३८.२१ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामाला शासनाची मंजुरी
अंबरनाथ : अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचा विकास करण्यासाठी शासनाने १३८.२१ कोटी रुपये खर्चाच्या मंदिर परिसर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ शहर देशाच्या धार्मिक आणि पर्यटन नकाशावर येईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
अंबरनाथमधील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले जुने पुरातन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण प्रकल्प तसेच शहरात सुरु असलेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या विविध विकास कामांची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यावेळी उपस्थित होते.
शिवमंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असून राष्ट्रीय स्तरावर अंबरनाथची ओळख टेम्पल सिटी म्हणून करण्यात आली आहे. शिवमंदिर देशभरातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळख होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मंदिर परिसराच्या विकासासाठी शासनाने १३८.२१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर सुशोभीकरणाचे काम काळ्या पाषाणामध्ये केले जाणार आहे. विकास कामांच्या अहवालास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी देखील मिळाल्याचे खा, डॉ. शिंदे म्हणाले.
असे होणार सुशोभीकरण
९६३ वर्षे जुन्या असलेल्या शिवमंदिरापासून १०० मीटर अंतराबाहेर प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. मंदिर परिसराच्या कामाची प्रक्रिया सुरु झाली आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेशद्वार, त्यासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँपी थियटर, भक्त निवास, चेक डॅम, वालधुनी नदीकिनारी संरक्षक भिंत आणि घाट यासारखी कामे करण्यात येणार आहेत. मंदिराच्या जवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन करण्याची योजना देखील अमलात आणली जाणार असल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
अंबरनाथचे शिवमंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असल्याने प्रकल्पातील कामे मंजुरीसाठी पुरातत्व विभागाची मंजुरी आवश्यक होती. त्यासाठी लागणारा पाठपुरावा करणाऱ्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या कामगिरीचे खा. शिंदे यांनी अभिनंदन केले. नवीन प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आदी विकासकामे शहरात सुरु असून महापालिका करू शकणार नाही अशी विकास कामे नगरपालिकेमार्फत सुरु असल्याचे खा. डॉ. शिंदे म्हणाले.
नगरपालिकेच्या नव्या इमारतीमधील दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, अब्दुल शेख, सुभाष साळुंके, रविंद्र पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी प्रास्ताविक केले.
गेल्या काही वर्षांपासून शिवमंदिर परिसरात होणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल १६ ते १९ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती खा. शिंदे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या संकटकालामुळे दोन वर्षे फेस्टिव्हल होऊ शकला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे काशी विश्वेश्व्रराच्या मंदिराचा विकास केला त्याचप्रमाणे अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचा विकास होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.