राऊत यांच्याकडून आनंद दिघेंना अभिवादन तर शिवसेनेकडून दुग्धाभिषेक
ठाणे : ठाकरे गटाकडून ठाण्यात आयोजित मेळाव्यापूर्वी संजय राऊत यांनी टेंभीनाक्यावरील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केले. तर काही क्षणातच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे पोहोचले आणि त्यांनी अपवित्र हातांचा स्पर्श पुतळ्याला झाल्याचा आरोप करत पुतळ्याला दुधाने अभिषेक केला. यावेळी दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील एन.के.टी. महाविद्यालायात रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, माजी खासदार राजन विचारे आदी नेते उपस्थित होते. मेळावा सुरु होण्यापूर्वी संजय राऊत हे टेंभी नाका परिसरातील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन टेंभी नाका परिसरातील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले. यावेळी संजय राऊत यांनी आनंद दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हे सर्व नेते तेथून निघून गेले. मात्र याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. संजय राऊत यांनी अर्पण केलेला हार काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करण्यात आला. संजय राऊत यांचा आनंद दिघे यांच्या पुतळ्याला स्पर्श झाल्याचा आरोप करत दुधाचा अभिषेक करण्यात आला.
टेंभी नाक्यावर तोपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याना एकत्र येऊ न दिल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही पक्षात मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. संजय राऊत गेल्या २५ वर्षात कधी आनंद दिघे यांना अभिवादन करायला गेले नाहीत मग आजच का गेले असा प्रश्न शहरप्रमुख हेमंत पवार यांनी उपस्थित केला. भविष्यात महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.