पंतप्रधानांच्या जाहीर सभेला शिंदे गटाची मिळणार रसद

नगरसेवकांना दोन बस भरून कार्यकर्ते आणण्याचे लक्ष्य

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील जाहीर सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. ठाण्यातील प्रत्येक माजी नगरसेवकाला दोन बस भरून कार्यकर्ते आणण्याचे फर्मान सोडण्यात आल्याने बाळासाहेब यांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

मुंबई दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रो 7ला हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीकेसी मैदानात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून त्यांना शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षाची ताकद दाखवून द्यायची आहे. शिवसैनिक पंतप्रधान श्री. मोदी यांच्या पाठीमागे आहेत हे दाखवून देण्यासाठी शिंदे गट देखील कामाला लागला आहे. ठाण्यातील ६५ माजी नगरसेवकांना प्रत्येकी दोन बस भरून कार्यकर्ते आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील आठवडाभर पदाधिकारी कार्यकर्त्यांना सभेला येण्यासाठी सूचना करत आहेत. उद्या सुट्टीचा दिवस नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांना सभेला येण्याची गळ घालताना पदाधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. भाजपचे पंतप्रधान आणि त्रास आम्हाला अशाही प्रतिक्रिया अनेक जणांनी ‘ठाणेवैभव’ला दिल्या आहेत.