शिंदे-फडणवीस सरकारने मांडला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प

शेती, रोजगार, पायाभूत सुविधांसह मेट्रोचे जाळे

मुंबई : कृषी विकास, सर्व समाज घटकांचा सर्व समावेश विकास, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास अशा पंचामृत ध्येयावर आधारित अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे -फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा यंदाचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करणार याकडे विरोधकांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृतावर आधारित ध्येयाचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाकृषिविकास अभियान राबविण्यात येणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा मिळणार आहे. याद्वारे सरकार ३३१२ कोटींचा भार उचलणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर कर्जमाफी योजना, मागेल त्याला शेततळे, कोकणासाठी काजू बोर्ड, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अशा माध्यमातून कृषी विभागाला अर्थसंकल्पात झुकते माप देण्यात आले आहे.

धनगर समाजासाठी एक हजार कोटी, मासेमार समाजाचा अनुशेष भरून काढण्यासाठी २६९ कोटी, मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना नव्या रुपात, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, आशा आणि अंगणवाडी सेवकांच्या मानधनात भरीव वाढ अशा सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यात येणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. गेल्या आठ महिन्यांत २७ सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. चालू २६८ पैकी ३९ प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहेत. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील २४ प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत १७ लाख ७२ हजार कुटुंबांना नळजोडणी देण्यात येणार असून २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाच हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येणार आहे.

महिला-मुलींसाठी सर्वकाही

लेक लाडकी योजनेद्वारे जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये, पहिलीत चार हजार, सहावीत सहा हजार अकरावीत आठ हजार, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये मिळणार आहेत. महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, मुंबईत महिला युनिटी मॉल, महिला केंद्रित पर्यटन धोरण, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत चार कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी आशा-अंगणवाडी सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे.

राज्यात मेट्रोचे जाळे पसरणार

राज्यात मेट्रोचं जाळं पसरणार असून अनेक नव्या मेट्रो मार्गांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मेट्रोसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे असून 46 किलोमीटरचा मार्ग खुला झाला आहे. यावर्षी आणखी 50 किमीचा मार्ग खुला करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. याशिवाय 43.80 किमीच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6708 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोची 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो हे नवीन प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.

मुंबई मेट्रो 10 अंतर्गत गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या 9.2 किमीसाठी 4476 कोटींची तरतूद,
मुंबई मेट्रो 11 अंतर्गत वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या 12.77 किमी लांबीच्या मार्गासाठी 8739 कोटी रुपयांची तरतूद
मुंबई मेट्रो 12 अंतर्गत कल्याण ते तळोजा या 20.75 कि.मी. लांबीसाठी 5865 कोटी रुपयांची तरतूद,
43.80 किमीच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6708 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.