* मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे प्रतिपादन
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे: या देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे महिमा मंडन होईल. जो कोणी औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन करण्याचा प्रयत्न करेल त्याला चिरडून टाकू, असा इशारा देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या मंदिराला तत्काळ तीर्थस्थळाचा देखील दर्जा दिला जाईल, अशी घोषणा केली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे फक्त मंदिर नाही, तर सुंदर तटबंदी देखील आहे, बुरूज आहेत. दर्शनीय असा प्रवेशमार्ग आहे. उद्यान आहे. शिवरायांच्या जीवनातले सर्व प्रसंग येथे पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशा शिल्पांमधून शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या घटना आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची क्षणचित्रे मांडण्यात आली आहेत. लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तीपिठाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल. भिवंडी-वाडा या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या शक्तीपिठाकडील येणाऱ्या सर्व मार्गांचे नियोजन उत्तमरित्या करावे, येथे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आवश्यक सोयी-सुविधा तयार कराव्यात. याकरिता निधीची कमतरता पडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे, हे आमचं दुर्दैव असून ज्या औरंग्यानं आमच्या हजारो लोकांना मारलं, त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावा लागत आहे. पण काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले.
छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून इनोस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे. छत्रपती संभाजी राजे यांना ज्या ठिकाणी कपटाने पकडले, तो संगमेश्वर येथील वाडा देखील राज्य सरकार ताब्यात घेऊन त्याचा विकास केला जाणार आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारला विनंती करून आग्रा किल्ल्यावरील शिवाजी महाराजांना अटक करून ठेवलेली कोठडी स्मारकासाठी राज्य सरकारच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. याशिवाय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परिसरातील रस्त्यांच्या बांधणीसाठी निधी देणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले.
यावेळी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, प.पू. बालयोगी सदानंद बाबा, ह.भ.प डॉ.कैलास महाराज निचिते, राष्ट्रसंत नीलकंठ शिवाचार्य, प.पू. आलोकनाथ महाराज, खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार दौलत दरोडा, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौघुले, शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी, विश्वनाथ पाटील, नरेंद्र पवार, जितेंद्र डाकी, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, अनंता भोईर आदी उपस्थित होते.