गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा एल्गार
ठाणे : या देशात वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते. पण, माणसातील वाघांची म्हणजे ओबीसींची जातगणना केली जात नाही. शिक्षणातील आरक्षण संपणार असल्यानेच माझा जीव तुटतोय; म्हणून आता मंडल आयोगाची दुसरी लढाई सुरु करावीच लागेल, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुकारला.
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यस्तरीय ओबीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे, राष्ट्रवादीचे ठाणे शहाराध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते. यावेळी ना. डॉ. आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन चक्क ढोल वाजवत मंचावर प्रवेश केला.
ना. डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच! कलाल समाजाबद्दल किती लोकांना माहित आहे, कलाल हा दारु विकणारा समाज आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पिछडा अन् अतिपिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे. शहरीकरण झाले असले तरीही 100 ओबीसी मुलांपैकी फक्त 8 जण पदवीधर होत आहेत. ओबीसींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात ओबीसींना शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे. सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण असले तरी सरकारी नोकर्या आहेत कुठे, सरकारी मालकीचे उद्योगांची तर विक्रीच झालेली आहे. अन् ज्या संघटनेने संविधानाला विरोध केला आहे. ते लोक तुमच्या आरक्षणाला पाठिंबा कसा देणार? ओबीसी समाज पुढे जात असल्याने काही लोकांच्या डोळ्यात खूपत आहे. घर काम करणार्या मातेचा मुलगा इंजीनियर होतो. हे आता काही लोकांना खूपत आहे. आपल्या घरातील धुणीभांडी करणार्या बाईचा मुलगा शिक्षण घेऊन जर परदेशात जाणार असेल तर काही लोकांच्या पोटात दुखणारच ना, त्यातूनच या लोकांचा ओबीसी आरक्षणाला विरोध आहे. असे सांगतानाच डॉ. आव्हाड यांनी, तुमच्या घरात आणि देवघरात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावा. कारण, त्यांच्यामुळेच आपण मुख्य प्रवाहात आलो आहोत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी हिजाबच्या मुद्यावरूनही केंद्र सरकारला इशारा दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी केले. या शिबिरासाठी राज्यभरातील विविध जातींचे सुमारे 500 प्रतिनिधी उपस्थित होते.