पोलिसांच्या ३१६ घरांची योजना लवकरच कार्यान्वित होणार !

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पोलीस वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा शुभारंभ

ठाणे : ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कर्तव्य रात्रंदिवस बजावणाऱ्या पोलिसांच्या सुमारे ६०० घरांच्या वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नवीन ३१६ घरांच्या पाच इमारतींचे काम येत्या काळात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जरीमरी येथील २४० घरे व १ ते ६ नवीन पोलिस वसाहतीतील ३६० घरे अशा एकूण ६०० घरांच्या सुरावस्थेबाबत आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून त्यास मंजुरी घेतली. या वसाहतींच्या दुरुस्तीचा कार्यादेश नुकताच देण्यात आला. मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार संजय केळकर यांनी तातडीने कोणताही गाजावाजा न करता श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला.

यापूर्वीही आमदारांच्या प्रयत्नाने रवी, भास्कर, सूर्य, अरुण, आदित्य या वसाहतीतील २६० सदनिकांचे बाथरूम व शौचालयाचे लिकेज, इतर दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम गृह विभागाच्या निधीतून करण्यात आले. चालक पोलीस वसाहत ए, बी, सी येथील ११२ सदनिकांच्या नूतनीकरणाचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून करण्यात आले.

ठाणे शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे १०५० घरे आहेत. तेथील १ ते १२ चाळ जवळपास शंभर वर्षे जुनी आहे. त्या ठिकाणी ३१६ घरांची पाच इमारतींची मंजुरी आमदार संजय केळकर यांनी शासन दरबारी घेतली आहे. लवकरच निधी उपलब्ध करून तेही काम चालू करणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ठाणे पोलीस व निवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या हक्काच्या घरांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.

या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहकार्य केल्याने श्री.केळकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.