एकच जमिन दोनवेळा विकली

विकासकाची फसवणूक करणाऱ्या २६ जणांवर गुन्हा

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील ठाकूरपाडा आणि अंजूरफाटा येथील २६ जणांनी आपसात संगनमताने भिवंडी सह दुय्यम निबंधक -१ कार्यालयात विकासकाने खरेदी केलेल्या जमिनीची दुबार विक्री करून विकासकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी विकासकाच्या फिर्यादीवरून २६ जणांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान ठाकूर, शामुबाई ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सीताबाई ठाकूर, सुनिता ठाकूर, जिवन ठाकूर, अमोल ठाकूर, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, सुदर्शन ठाकूर, विजय भोईर, अमर भोईर, अजय भोईर, टीवक उर्फ तुषार ठाकूर, रामा ठाकूर, येसूबाई ठाकूर, शनिदास ठाकूर, रोहित ठाकूर, गौरव ठाकूर, मोहित ठाकूर, चांगुणाबाई मढवी, मिलिंद मढवी, काशिनाथ ठाकूर, सदानंद ठाकूर, सुनिल नकुम, हसमुख केशवजी कंझारिया अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे पिंपळनेर सर्व्हे नं.६९/३ व ६९/५ या जमिनींबाबत मे.सिनीक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तर्फे संचालक ओमप्रकाश गोयंका यांच्यातर्फे कुलमुखत्यार म्हणून विनोद धरमदास तलरेजा यांच्याशी करारदस्त क्र.९०६५/२००७ हा ४ डिसेंबर २००७ रोजी करण्यात आला होता. याची माहिती असतानाही नमूद जमिनींच्या ७/१२ वर सुनील नकुम व हसमुख कंझारीया यांनी इतर २४ जणांची नावे असल्याचे हेरून पैशांचा व्यवहार झालेला असूनही पुन्हा सह दुय्यम निबंधक-१ कार्यालयातून पुन्हा त्याच जमिनीची विक्री करून फिर्यादी विकासक प्रकाश पटेल यांच्या मे.भूमी असोसिएट आणि मे.सिनीक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे.

या प्रकरणी विकासक प्रकाश पटेल यांच्या फिर्यादीवरून २६ जणांवर ५ फेब्रुवारी रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक अरुण घोलप करीत आहेत.