ठाणे – मुंब्रा येथील खरवली देवी मंदिर परिसरात खदानीमध्ये डोंगरावर अडकून पडलेल्या एका मुलाला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दोन तासांनी सोडविण्यात यश आले.
मोहम्मद रिहान (१७) असे डोंगरावर अडकून पडलेल्या मुलाचे नाव आहे. तो मुंब्रा येथील बिलाल अपार्टमेंट येथे राहतो. आज संध्याकाळी रिहान त्याच्या काही मित्रांसोबत खरवली देवी मंदिर परिसरात असलेल्या मैदानात गेला होता. त्यावेळी तेथे असलेल्या खदाणीतील डोंगरावर रॉक क्लाइम्बिंग करिता चढला होता. सुमारे ४० ते ४५ फूट उंचीवर गेल्यानंतर त्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला खाली उतरता न आल्याने तो घाबरला. त्याच्या मित्रांनी ही माहिती घरच्यांना दिल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांना आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला ही माहिती कळवण्यात आली. शीळ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून या मुलाला डोंगरावरून खाली उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिले.