मनोरुग्णालय जागेवरील हरकतीवर गुरुवारी सुनावणी
ठाणे : विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा प्रस्तावित असताना एका याचिकेमुळे गेली आठ वर्षे रखडलेले हे स्थानक आता दृष्टीपथात आले आहे. येत्या गुरुवारी या याचिकेवर होणाऱ्या सुनावणीत पालिकेच्या बाजूने कौल लागल्यास विस्तारीत स्थानकाचे रुतलेले चाक लवकरच हलण्याची शक्यता आहे.
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून रोज लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. वाढत्या प्रवाशांमुळे या स्थानकावर मोठा ताण पडत आहे. परिणामी प्रवाशांना रोजचेच मरण अनुभवावे लागत आहे. या स्थानकात होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारीत ठाणे स्थानक निर्माण करण्याचा विचार पुढे आला.
मेट्रोचे जाळे उभारत असताना या नवीन स्थानकामुळे प्रवाशांना आणखी एक पर्याय मिळणार आहे. म्हणूनच मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने विस्तारित ठाणे स्थानकाचा प्रस्ताव पुढे आणला. त्यासाठी कोपरी येथील मनोरुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली. त्याची आखणीही करण्यात आली. पण या जागेसाठी आधी आरोग्य विभागाचा अडथळा समोर आला. त्यातून मार्ग निघत नाही तोच
काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे गेली आठ वर्षे हे स्थानक रखडलेले आहे.
मनोरुग्णालयाला हा भुखंड दान म्हणून मिळालेला आहे. ज्या उद्देशाने ती जमीन दान करण्यात आली तेथे विस्तारित ठाणे स्थानक उभारणे चुकीचे असल्याचे याचिकेत म्हटले आहे. १ डिसेंबर २०२२ रोजी या प्रकरणाची होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राजिनामा दिल्याने यापदी ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती झाली आणि या याचिकेच्या सुनावणीला १२ जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे. याच दिवशी या प्रकरणाचा निकाल लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे विस्तारित रेल्वे स्थानकाची जबाबदारी मध्य रेल्वेची असली तरी त्यामध्ये अपेक्षित सोयी-सुविधा उभारण्याचा विडा ठाणे महापालिकेने उचलला. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २८९ कोटी खर्चाच्या विस्तारित ठाणे स्थानकाची आखणी करण्यासाठी आवश्यक तयारी झाली आहे. सुनावणीमध्ये निर्णय प्रशासनाच्या बाजूने लागल्यास तातडीने कामाला सुरुवात करणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकारी सहआयुक्त संदिप माळवी यांनी केला आहे.