रस्तेच फाटले, पॅच कुठे-कुठे लावायचे?

ठाण्यात १९८ खड्डे शिल्लक असल्याचा प्रशासनाचा दावा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना सक्त आदेश दिल्यानंतर ठाण्यात खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असून आता फक्त १९८ खड्डेच शिल्लक राहिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट, खडींचा वापर होत असून ही कच्ची मलमपट्टी किती दिवस तग धरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. पालिका हद्दीतील रस्त्यांसह मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना होणारी वाहन चालकांच्या कसरतीमुळे मागील आठवडाभर ठाण्याची वाहतूक मंदावली आहे. पंधरा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते दीड तास वेळ लागत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. त्यातच खड्ड्यांमुळे अपघात वाढत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच याची दखल घेतली आहे.

ठाणे महापालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये छोटेमोठे ७९७ खड्डे प्रशासनाला दिसले. हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्यानंतर संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे.

वास्तविक खड्डे बुजवण्यासाठी हायटेक प्रणालीचा वापर करणार असा दावा पालिकेने केला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सध्या खडी, सिमेंट, पेव्हर ब्लॉकच्या मदतीने खड्डे बुजवण्याची मोहिम उरकली जात असल्याचे दिसत आहे.

या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ५८९ खड्डे बुजवण्यात आले असून केवळ १९८ खड्डेच शिल्लक राहिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पावसाची अशीच उघडीप मिळाल्यास दोन दिवसांत उर्वरित खड्डे बुजवून ठाणे खड्डेमुक्त होईल, अशी अपेक्षाही यंत्रणेने व्यक्त केली आहे.

खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून एक अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ते दुरुस्ती संबंधित यंत्रणा करत आहे. त्यामुळे ठाणे-नाशिक आणि घोडबंदर मार्गावरील रस्ते दुरुस्तीलाही वेग आला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या नगर अभियंत्यांनी दिली.