माजिवडा चौकातील रस्ता खचला; वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल

ठाणे : शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या माजिवडा चौकातील रस्ता खचला. या घटनेमुळे माजिवडा चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा परिणाम घोडबंदर, कोलशेत, वसंत विहार भागातून ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागला. सुमारे महिन्याभरापूर्वी देखील याच परिसरात रस्ता खचला होता. वारंवार प्रकार घडत असल्याने शहरातील रस्त्यांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

माजिवडा चौक परिसरात मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, कोलशेत, माजिवडा गाव, कापूरबावडी, बाळकूम, वृंदावन सोसायटी, वसंत विहार भागातील हजारो वाहने वाहतूक करतात. येथील माजिवडा चौकातून वृंदावन गृहसंकुलाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गालगतचा रस्ता मंगळवारी रात्री अचानक खचला. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर बुधवारी सकाळी रस्ता खचलेल्या भागात ठाणे महापालिकेने अडथळे बसवून संबंधित रस्त्याचा भाग वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे घोडबंदर, कापूरबावडी, माजिवडा, कोलशेत येथून माजिवडा चौकमार्गे ठाणे रेल्वे स्थानक, वृंदावन सोसायटी, कोर्टनाका, खोपट येथे वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

या रस्त्याखालून मुंबई महापालिका, स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनी गेल्या आहेत. त्यामुळे जलवाहिनीला गळती लागली की इतर कारणामुळे रस्ता खचला याबाबतची माहिती ठाणे महापालिकेला मिळत नव्हती. माजिवडा चौकात साकेत-कोपरी आनंदनगर उन्नत प्रकल्पामुळे काही दिवसांपूर्वीच खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता खचल्याने आणि उन्नत मार्गिकेच्या प्रकल्पामुळे येथील रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे कोंडीत भर पडली होती.

सुमारे महिन्याभरापूर्वी मुंबई नाशिक महामार्गावरून माजिवडा चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गालगत देखील रस्ता खचला होता. चौक परिसरात महिन्याभरात दुसर्‍यांदा प्रकार घडल्याने रस्त्यांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले होते.