नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महापालिकेने आपल्या तीन शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाशी संलग्न शिक्षण सुरू केले आहे. त्या अनुषंगाने शाळा क्र. ९३ (नेरूळ सेक्टर-५०), नमुंमपा शाळा क्र. ९४(कोपरखैरणे सेक्टर-११) आणि नमुंमपा शाळा क्र. ९८ (सारसोळे) या तीन ठिकाणी सीबीएसई अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.
या शाळांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते इयत्ता ९.वीपर्यंतच्या वर्गांमध्ये रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही प्रवेश प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क ठेवण्यात आली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हा महापालिकेचा उद्देश आहे. त्यामुळे नमुंमपा कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती नवी मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.nmmc.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संबंधित तिन्ही शाळांमध्येही प्रवेशाबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे खासगी शाळांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून, सर्वसामान्य पालकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि सीबीएसई अभ्यासक्रमाचा लाभ मिळणार असल्याने या शाळांना पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.