डोंबिवली : डोंबिवलीत रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे चक्क शेअरिंग रिक्षा बंद करण्यात आल्या. यावर प्रवाशाने आवाज उठवताच दुपारी रिक्षा बंद करून प्रवाशांना वेठीस धरण्यात आले. ही घटना चक्क वाहतूक नियंत्रण पोलीस ठाण्याच्या समोर झाली.
घोळक्यात आलेल्या रिक्षा चालकांनी त्या प्रवाशाला अरेरावी करीत केस मागे घ्या नाहीतर आम्ही रिक्षा बंद ठेवू असेही धमकावले. एव्हढेच नाही तर वाहतूक नियंत्रण उपशाखेत रिक्षाचालकांनी मोर्चाही आणला. परंतु विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी प्रवाशाची लेखी तक्रार घेऊन दंडात्मक कारवाई करू असे सांगितले.
एमएच ०५ वाहतूक संघटनेचे सदस्य प्रसाद आपटे हे दुपारी ४ वाजता डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस ठाण्याजवळील रिक्षा स्टँडवर गेले. आपटे यांनी आयरेरोड तुकाराम नगर येथे जाण्यासाठी एमएच ०५-बीजी-८१८९ रिक्षात बसले. आपटे यांनी शेअरिंग भाडे विचारले असता रिक्षाचालक छोटूलाल यादव यांनी या स्टँडवर शेअरिंग व मीटर भाडे पद्धत नसल्याचे सांगितले. यावर आपटे यांनी विरोध करत आरटीओच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे सांगताच सर्व रिक्षाचालक एकत्र आले आणि त्यांनी रिक्षा बंद केल्या. रिक्षाचालकांनी रिक्षा बंद केल्याने प्रवासी वैतागले होते.
रिक्षाचालकांनी वाहतूक नियंत्रण उपशाखेसमोर मोर्चा काढला. आपटे आणि रिक्षा युनियन पदाधिकारी व रिक्षाचालक यांच्यात वाद सुरू असताना वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी घेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. मात्र पदाधिकाऱ्यांनी शेअरिंग पद्धत लॉकडाऊनपासूनच बंद असून आरटीओचे नियम दाखवा, अशी भूमिका घेतली. वाहतूक पोलिसांनी आपटे यांनी तक्रार नोंदवली. काही वेळाने रिक्षाचालक वाहतूक शाखेसमोरून निघून गेले. मात्र हा सर्व प्रकार होऊनही शहरातील रिक्षा संघटनेच्या एकाही प्रतिनिधीने या विषयी ब्र काढला नाही. आता रिक्षा व्यावसायिकांनी उपाशी मारायचे का असे प्रश्न विचारण्यात अग्रेसर असणाऱ्या युनियन नेत्यांनी प्रवाश्यांचेही पोट आहे, याकडे लक्ष द्यावे, असे प्रवासी बोलत आहेत. दिवसेंदिवस रिक्षाप्रवास त्रासदायक होत असून महापालिकेने आता वेगळी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी प्रवासी संघटना करीत आहे.