कापणीची कामे लांबणीवर; शेतकरी चिंतातुर
शहापूर : गेल्या कित्येक दिवसांपासून शहापूर तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून कापणीसाठी परिपक्व झालेली भात पिके आणि नाचणी-वरई शेतातच आडवी झाल्याने शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे.
परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने भात लावण्यासाठी व मशागत आणि मजुरी यासाठी केलेली उसनवार बँकेकडून शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
मुंबईनजीक असलेला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासीबहुल तालुका असून येथील बहुतांशी शेतकरी रब्बी हंगामात भात पिकाची लागवड करत असतात. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकरी राजा सुखावला होता. भात पिके ही जोमात होती. मात्र यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांमध्ये परतीच्या पावसाने ऐन भात कापणीच्या वेळेस थैमान घातल्याने भातपिके शेतातच आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे. सतत पडणाऱ्या परतीच्या पावसाने परिपक्व झालेली भात पिके निकृष्ट दर्जाची झाली असून भात पिकापासून मिळणारी गुरांची वैरण देखील पावसात भिजून खराब झाली आहे.
परतीच्या पावसाने केलेली भात पिकांची अवस्था पाहून शेतकरी राजा हताश झाला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्ग कोपाने हिरावून नेल्याने केलेली उसनवारी, बँक कर्ज फेडायचे कसे अशा विवेंचनेत शेतकरी राजा सापडला आहे. रोज सायंकाळी परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने शेतात परिपक्व झालेली भात पिके कापणी करता येत नाहीत, भातपिकाच्या कापण्या लांबणीवर पडल्या आहेत.
मोलमजुरी करून आणि काबाडकष्ट करून केलेली शेती परतीच्या पावसाने शेतातच आडवी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी गोठेघर येथील शेतकरी उमेश डिंगोरे यांनी केली आहे.
ज्यांनी सोसायट्यांकडून पीक कर्ज घेतले आहे, त्यांचा विमा उतरवला असून त्यांना विमा कंपनीकडून लाभ मिळेल. मात्र बिगर कर्जदार शेतक-यांनी विमा उतरवला नाही, त्यांचे पंचनामे होऊन त्या शेतक-यांना देखील पीक विमा मिळेल, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक राजाराम खाडे यांनी दिली.
शहापूर तालुक्यात 15,220 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते तर 2,250 हेक्टर क्षेत्रावर नाचणी तर 980 हेक्टर क्षेत्रावर वरई लागवड केली जाते. मात्र परतीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापलेले भातपीक शेतात आहे तर काही पीक कापणीच्या लायक शिल्लक राहिलेले नाही.